शाळा क्र. ५ च्या पाण्याने नागरिकांचे हाल
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
चेई येथील गंगापुरी भागातील नवीन नगरपालिका शाळा क्रमांक ५ च्या प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे. शाळेच्या पाण्याच्या टाकीचा ओव्हरफ्लो पाईप चक्क मुख्य रस्त्यावर उंचावरून उघड्यावर सोडण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावर कृत्रिम 'धबधबा' तयार झाला असून, साचलेल्या पाण्यामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिक नरकयातना भोगत असून, आता जनतेचा संयम सुटताना दिसत आहे.
उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डांबरी रस्ता उखडला असून तेथे जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे, परिणामी अनेक दुचाकीस्वार येथे पडून जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर, उंचावरून पडणारे हे पाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या थेट अंगावर पडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या पाणी व्यवस्थापनाचा हा 'नमुना' पाहून पालिकेच्या अभियंत्यांचे डोळे मिटले आहेत का? असा जळजळीत सवाल नागरिक विचारत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या गंभीर बनली आहे. मात्र, या भागातील लोकप्रतिनिधींनी या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. निवडणूक जवळ आली की जनतेकडे हात जोडणाऱ्या नेत्यांना जनतेचे हे हाल दिसत नाहीत का? स्थानिक लोकप्रतिनिधी यावर गप्प का आहेत, की त्यांना प्रशासनाचा हा गलथानपणा मान्य आहे? असा संताप आता गंगापुरीतील नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत आणि नगरपालिकेने त्या पाईपची विल्हेवाट लावावी, ही मागणी आता केवळ विनंती राहिलेली नाही. संतप्त स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, "जर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर पालिका आणि बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे दरवाजे तोडून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल," असा इशारा दिला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



