दोन सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील वाई शहर आणि परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. टोळीप्रमुख यश उर्फ वश्या अभिजीत सोंडकर (वय १९) आणि टोळी सदस्य मेघराज उर्फ सोन्या संतोष मोरे (वय २०, दोन्ही रा. गंगापुरी, वाई) या दोघांना वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.
वाई पोलीस ठाणे हद्दीत या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत पोहोचवणे आणि शिवीगाळ करत दमदाटी करणे यांसारखे अनेक गंभीर दखलपात्र गुन्हे वाई पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. या टोळीचा वाई तालुका परिसरातील लोकांना मोठा त्रास होत असल्याने, त्यांच्यावर सर्वसामान्य जनतेतून कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात होती.
वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता, ज्याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दोन्ही आरोपींना दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश पारित केले. आगामी निवडणूक काळात जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोक्का, आणि हद्दपारीची मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पो. हवा. प्रमोद सावंत, अमित संपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म. पो. कॉ. अनुराधा सणस वाई पोलीस ठाण्याचे पो. को.नितीन कदम, निलेश देशमुख यांनी यशस्वीरीत्या कामगिरी पूर्ण केली.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










