वाई-वाठार रोडवर पूल धोकादायक!
शिवशाही वृत्तसेवा वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई वाठार रस्त्यावरील ओझर्डे गावच्या हद्दीतील श्री स्वामी समर्थ मठ, कदमवाडी नजीकच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्यामुळे एक चारचाकी गाडी ओढ्यात कोसळल्याची घटना आज दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एम एच ११ सी पी ९३६८ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पुलाला कठडा नसल्याने थेट बाजूच्या ओढ्यात खोलवर कोसळली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले.
त्यांनी गाडीतून जखमी चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. चालकाचे नाव समजू शकले नसले तरी, तो नांदवळ, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील रहिवासी असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पुलाला कठडा नसल्यामुळे अपघाताचा धोका नेहमीच असतो. याबाबत बांधकाम विभागाला वारंवार सूचना आणि मागणी करूनही, विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा पूल धोकादायक बनल्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित या पुलावर संरक्षक कठडा बसवून भविष्यातील संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














