छ.संभाजीनगर जिल्हा गुन्हे शाखेची आढावा बैठक
शिवशाही वृत्तसेवा वैजापूर ( प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी )
मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी स्थिती, प्रलंबित तपास, तांत्रिक साधनांचा वापर, सायबर सुरक्षितता, नागरिकाभिमुख पोलीसिंग, तसेच 24 पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्यात आला.
गुन्हे तपासात गती - चोरी व मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर विशेष भर
मा. विशेष महानिरीक्षकांनी प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी करण्याचे आणि चोरी संबंधित गुन्ह्यांचा तपास एका जबाबदार अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. चोरी गेलेला मुद्देमाल तात्काळ हस्तगत करून फिर्यादींना परत देणे, तपासातील गुणवत्ता वाढवणे आणि जलद निपटारा करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
“नागरिकांचा विश्वास हा तपासातील वेग आणि पारदर्शकतेवर अवलंबून आहे,” असे त्यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या – मतमोजणी व स्ट्रॉंग गार्डसाठी कडक सुरक्षा बंदोबस्ताचे स्पष्ट निर्देश.
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांनंतर आता जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी बैठकीत नमूद केले. मतमोजणी प्रक्रिया ही निवडणुकांच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील टप्पा असून, कोणताही अनावश्यक तणाव, गैरप्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यावर त्यांनी भर दिला.
यासाठी स्ट्रॉंग रूम, मतपेट्यांच्या वाहतूक मार्ग, आणि मतमोजणी केंद्रांवर बहुपेडी सुरक्षा यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले. केंद्रांच्या आतील व बाहेरील परिसरात पोलिसांचा शिस्तबद्ध बंदोबस्त, प्रवेशद्वारांवर कठोर तपासणी, CCTV आणि व्हिडिओ मॉनिटरिंग प्रणालींचा वापर, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष देखरेख अनिवार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर अवेअरनेस - नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेची जाणीव
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याची नोंद घेऊन जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. ऑनलाईन फसवणूक, मालवेअर, सोशल इंजिनिअरिंग यासारख्या गुन्ह्यांबाबत नागरिकांना सतत शिक्षित करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि माध्यमांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले.
ई-प्रशासन सुधारणा व तांत्रिक प्रणालींचा वापर....
बैठकीदरम्यान ‘आपले सरकार’, ई-ऑफिस, पोलीस अधीक्षक कार्यालयाची वेबसाईट, तसेच नव्याने विकसित वेब-अॅप्लिकेशन याबाबत कामकाजातील पारदर्शकता, तात्काळ सेवा वितरण आणि डेटा व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
24 पोलीस ठाण्यांचा सविस्तर आढावा - सात महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर
जिल्ह्यातील सर्व 24 पोलीस ठाणे सह, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा ,आणि वाहतूक शाखेचा समावेशक आढावा घेण्यात आला. यामध्ये पुढील बाबींवर विशेष भर देण्यात आला —
1. अवैध व्यवसायांवरील कडक कारवाई (दारूबंदी, जुगार, एन.डी.पी.एस., आर्म्स अॅक्ट, वाळू चोरी, पिटा)
2. प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण घटवणे
3. फरार आरोपींना अटक व कन्व्हिक्शन दर वाढविणे
4. समन्स व वॉरंट बजावणीतील प्रगती
5. मालमत्ता विषयक गुन्हे व मुद्देमाल निर्गती
6. मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीत काटेकोरपणा
7. वरिष्ठ प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा, तपासात गती आणा आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करा.”
ई-बिट प्रणाली आणि प्रभावी नाईट पेट्रोलिंग..
जिल्ह्यातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेसाठी ई-बिट प्रणाली प्रभावीपणे राबविणे, बीटबुक अद्ययावत ठेवणे, संशयितांवर देखरेख, तसेच रात्रीच्या वेळी कडक नाईट पेट्रोलिंग ठेवण्याचे निर्देश दिले.
तपासातील क्षमता वाढवण्यासाठी राष्ट्रीय पोर्टल्सचा वापर करणे अत्यावश्यक. ..
तपास अधिक वैज्ञानिक, वेगवान आणि अचूक करण्यासाठी मा. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी 13 राष्ट्रीय पोर्टल्स प्रणालीचा तपासात उपयोग करणे बाबत स्पष्ट केले .
कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव
उल्लेखनीय कामगिरीबद्दल 20 अधिकारी आणि 43 अंमलदारांना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या बैठकीस पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सर्व 24 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














