काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना
शिवशाही न्यूज (कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी)
माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, अशी विविध पदे भूषवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पहाटे लातूर येथील राहत्या घरी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास लातूरमधील “देवघर” या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची प्राणज्योत मालवली. दीर्घकालीन आजारपणामुळे घरच्या वातावरणातच त्यांच्यावर उपचार सुरु होते.
शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
असा होता चाकूरकरांचा जीवन प्रवास
शिवराज पाटील यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. ते लातूरसह मराठवाड्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता. २००४ मध्ये लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानंतरही गांधी परिवाराचे विश्वासू असल्याने राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या होत्या. २००४ ते २००८ या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले. त्यापूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना यांच्या मंत्रिमंडळात ही ते संरक्षण मंत्री होते. १९९१ ते १९९६ दरम्यान ते लोकसभेचे अध्यक्ष होते. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक होते.
२६/११ हल्ल्यानंतर राजकीय विजनवासात
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. देशावर दहशतवादी हल्ल्याचे संकट आलेले असताना केंद्रीय गृहमंत्री कपडे बदलण्यात व्यस्त आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे 30 नोव्हेंबर रोजी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काही काळ राज्यपाल पदावर राहिले परंतु पुढे मात्र ते राजकीय विजनवासात गेले.
मान्यवरांकडून शोक व्यक्त
शुक्रवारी पहाटे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्यानंतर देशभर शोक व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर मान्यवरांकडून देखील श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आठवणी जाग्या करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














