80 वर्षांच्या वृद्ध महिलेला मारहाण करून दागिने लंपास
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पसरणी येथील सुभाष नगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी थेट एका वृद्ध महिलेच्या घरात घुसखोरी करून जबरदस्तीने दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी शांता किसन महागडे (वय 80 वर्षे, रा. सुभाष नगर, पसरणी, ता. वाई) या त्या वेळी घरात एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत तीन अज्ञात नराधमांनी अचानक घरात घुसून फिर्यादीचे तोंड दाबून धरले, मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील दोन पट्टीची सोन्याची माळ व दोन कर्णफुले जबरदस्तीने काढून पळ काढला. या चोरीत सुमारे ₹2 लाख किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाले असून अद्याप एकही आरोपी ताब्यात आलेला नाही.
कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा - नागरिकांमध्ये तीव्र संताप
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून “रात्री घरात एकट्या वृद्ध महिलाही सुरक्षित नाहीत का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 323/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे करत आहेत
सदर घटनेमुळे वाई तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



