मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाला ऐतिहासिक यश
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
दीर्घकाळ प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अखेर सकारात्मक मार्गावर आला असून मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक उपोषण चळवळीला यश मिळाले. या पार्श्वभूमीवर कवठे गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. याच अनुषंगाने गावातून भव्य विजय व आभार मोर्चा काढण्यात आला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रखर उपोषण केले. त्यांचा संघर्ष अहिंसात्मक असून त्यांनी केलेल्या उपोषणामुळे राज्य शासनावर मोठा दबाव निर्माण झाला. शासनाने शेवटी सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला. या निर्णयाने मराठा समाजात उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्णयाची माहिती मिळताच कवठे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात एकत्र येऊन गावातून मिरवणूक काढली. सवाद्य स्पीकरवरून घोषणाबाजी करत शेकडो ग्रामस्थांनी गावातून आभार फेरी काढली.
मार्गात ग्रामस्थांना पेढे व साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यवसायिक अशा सर्व स्तरातील लोक या मोर्चात सहभागी झाले. गावातून निघालेला मोर्चा मुख्य रस्त्यांवरून फिरत शेवटी भैरवनाथ मंदिरापुढे संपन्न झाला.
.
मोर्चाच्या शेवटी आयोजित सभेत मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये दिलीप चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या शांततापूर्ण आंदोलन शैलीचे कौतुक करत समाजाने ही एकजूट कायम ठेवावी असे आवाहन केले. माधवराव डेरे यांनी आरक्षणामुळे समाजातील तरुणाईला शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यासाठी शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे सांगितले. प्रमोद डेरे यांनी या आता नोंदी तपासून त्यानुसार कागदपत्रे गोळा करून दाखले काढण्याचे आवाहन केले. विजय पोळ यांनी मराठा समाजाने राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात पुढाकार घ्यावा, यश टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत असे सांगितले. विनोद पोळ यांनी युवकांना मार्गदर्शन करत "आरक्षण मिळाले म्हणजे संघर्ष संपला नाही; आता खरी परीक्षा सुरू झाली आहे" असे सांगून सकारात्मक विचारांची गरज अधोरेखित केली.
प्रदीप डेरे यांनी सातारा गँजेट मिळेपर्यत लढा चालू ठेवावा लागला तर ग्रामस्थांनी तयार रहावे असे सांगितले. ग्रामस्थांनी मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे आभार मानले. अनेकांनी या निर्णयामुळे समाजातील वंचित तरुणाईला नवा मार्ग खुला झाल्याची भावना व्यक्त केली. "आजपर्यंत आमच्यासमोर बंद दरवाजे होते, आता शैक्षणिक व शासकीय सेवेत संधीची खिडकी उघडली आहे," असे सचिन पोळ यांनी सांगितले. महिला वर्गानेही आनंद व्यक्त करत समाजातील मुलींना आता उच्च शिक्षण व नोकरीत स्थान मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














