लवकरच वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
लोणंद परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाला नवे पर्व सुरू झाले आहे. संत सावता महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाची नोंदणी समाज नोंदणी अधिनियम १८६० (Act XXI of 1860) अंतर्गत 12 ऑगस्ट 2025 रोजी सहाय्यक निबंधक, सातारा येथे करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष महादेव (बंडा) क्षीरसागर, उपाध्यक्ष सुधाकर क्षीरसागर, खजिनदार स्वप्नील क्षीरसागर, सचिव अतुल डोईफोडे तसेच संचालक अनिल रांजणे, रामचंद्र जाधव, दिपक शेळके आणि सौ. वैशाली भोसले अशी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
या संस्थेच्या पहिल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत लोणंद येथे वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेमध्ये १५ ते १८ वयोगटातील युवकांना वारकरी परंपरेचे ज्ञान, संत साहित्य अभ्यास, अभंग-भजन परंपरा, नैतिक मूल्ये तसेच पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व संगोपन याबाबत शिक्षण दिले जाणार आहे.
"वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि समाजसेवेचा संगम आहे. नवीन पिढीला या संस्कारांची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजात बंधुता, नैतिकता आणि सेवा भाव वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे." असे अध्यक्ष महादेव क्षीरसागर म्हणाले.
संस्थेच्या कार्याचा शुभारंभ नुकताच वारकरी बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी वारकरी मंडळींना ओवाळणी व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, ग्रामस्थ आणि वारकरी मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा