कृषी संशोधन केंद्र बारामती ए.आय. विभागाचे प्रमुख तुषार जाधव करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवार दि.१८ रोजी दपारी १ वाजता आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत शेतकरी मेळावा आयोजित केला असून यामध्ये ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (ए, आय.) तंत्रज्ञानाचा वापराबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे.
या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील असून जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. व्हीएसआय, पुणे येथील पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग व बारामती येथील ए. आय. विभागाचे प्रमुख तुषार जाधव हे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे प्रमुख नगदी पीक आहे. आपल्यासह सर्वच कारखाने या शाश्वत पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करून शेतीमध्ये नवनविन प्रयोग करीत असतात. तरीही ऊस शेतीबाबत शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते,
यामध्ये प्रामुख्याने जमिनीची सुपिकता व उत्पादनाची कमतरता, रासायनिक खतांचा प्रचंड प्रमाणात होणारा वापर, पाण्याचा अतिरिक्त वापर, वाढत चाललेला एकरी खर्च, निसर्गाची अवकृपा, ऊसावरील कीड व रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्वांवर मात करण्यासाठी बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातन कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापराचा देशातील पहिलाच प्रयोग करण्यात आलेला होता आणि तो यशस्वीही झालेला आहे.
या प्रयोगामुळे ऊस उत्पादन ४० टक्यांपर्यत वाढले असुन लागणारा खर्च आणि पाण्यातही सुमारे ३० टक्कयांची बचत झाल्याचे दिसून आलेले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ५६ गटातील २५० निवडक प्रगतशील शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या क्षेत्रावर हा प्रयोग करण्याचा बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे. कृत्रिम बुधिमत्ता (ए.आय.) चा वापर केल्यास आपल्या शेतीमधील पीकाबाबतची सर्व अद्यावत माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या फोनवर मिळणार असुन यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. याबाबत व्हीएसआय पुणे येथील पीक उत्पादन व संक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग व बारामती येथील ए.आय. विभागाचे प्रमुख तुषार जाधव हे उपस्थित शेतकऱ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवार दि.१८ रोजी दपारी १ वाजता किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास किसन वीर व खंडाळा साखर कारखाना कार्यक्षत्रातील ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यानी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही किसन वीर चेअरमन नामदार मकरंद पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळाने केले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा