राष्ट्रवादीचे संतोष ननावरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शिवशाही उत्सव, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
वाई तालुका व सातारा जिल्ह्यात ग्राहकांची कोणतीही संमती न घेता खाजगी कंपन्यांमार्फत जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम त्वरित थांबवावे अन्यथा १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हा असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष संतोष ननावरे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयास स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते. तरीदेखील सातारा जिल्ह्यात वीज ग्राहकांना कोणतीही माहिती न देता, कोणतीही लेखी संमती न घेता, घरात प्रवेश करून जुने, व्यवस्थित चालणारे मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत.
ग्राहकांनी यास विरोध दर्शविल्यास त्यांना दमदाटी केली जात असल्याचेही ननावरे यांनी निदर्शनास आणले. वीज कायदा २००३ मधील कलम ४७(५) अन्वये स्मार्ट मीटर लावण्यासाठी ग्राहकांची संमती आवश्यक आहे, अशी तरतूद असूनसुद्धा ग्राहकांचे हक्क डावलले जात आहेत.
स्मार्ट मीटरमुळे बिलात चौपट वाढ
ननावरे यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बसवण्यात आलेल्या अनेक ग्राहकांना जुना सरासरी दराच्या तुलनेत अवास्तव आणि वाढीव वीज बिल येत आहे. वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन खोल्यांच्या घरांमध्ये मार्च महिन्यात ३० मिनिट वापरावर ₹३९०, एप्रिलमध्ये ३४ मिनिट वापरावर ₹७५०, तर जूनमध्ये तब्बल ६३३ युनिटचे बिल आले आहे.
महावितरणकडे यासंदर्भात तक्रार केली असता कोणतीही स्पष्ट उत्तरं न देता जबाबदारी झटकली जाते, अशी टीका देखील संतोष ननावरे यांनी केली. महावितरणकडे स्मार्ट मीटर तपासणीसाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
ग्राहकांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे
"महागाईने होरपळलेल्या जनतेवर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आर्थिक लूट सुरू आहे. ग्राहकांची संमती न घेता कोणत्याही प्रकारे स्मार्ट मीटर बसवणे म्हणजे लोकशाहीची पायमल्ली आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबवले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा असंघटित कामगार सेलच्या वतीने १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल," असा ठाम इशारा अध्यक्ष संतोष ननावरे यांनी दिला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा