पक्षकारांना वेळेत व सुलभ न्याय मिळण्यास होणार मदत
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
घोडनदी, ता. शिरूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मा. ना. न्यायमूर्ती संदीप मारणे व अरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रसंगी न्यायव्यवस्थेतील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. महेंद्र महाजन यांनी सांगितले की, शिरूर ते पुणे हे अंतर लक्षात घेता अतिशय वर्दळीचा मार्ग असून पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी मोठा वेळ व खर्च करावा लागत होता. घोडनदी येथे न्यायालय सुरू झाल्याने पक्षकारांना वेळेत व सुलभ न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. राजेंद्रजी उमाप सर यांनीही घोडनदी येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तसेच या उद्घाटन समारंभास अॅड हर्षद निंबाळकर, अॅड विठ्ठल कोंडे देशमुख, अॅड ए यु पठाण सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
घोडनदी व परिसरातील नागरिक, पक्षकार व वकील वर्गासाठी हे न्यायालय सुरू होणे ही अत्यंत आनंदाची व दिलासादायक बाब असून, यामुळे न्यायप्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



