भक्तीभावाने ऋषीपंचमीचा सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ऋषीपंचमी निमित्त भुईंजच्या कृष्णा नदीच्या काठावरील आचार्य भृगूऋषीमठात महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य परमपूज्य श्री. सद्गुरू नारायण आण्णा महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व श्री. सद्गुरू टेंबे स्वामी यांच्या अधिपत्याखाली ऋषीपंचमीचा सोहळा साजरा झाला. उपवासाच्या महाप्रसादाने ऋषीपंचमीचा महिमा जोपासण्यासाठी राज्यभरातून आलेल्या महिलांच्या गर्दीन अवघा कृष्णा काठ धन्य झाला. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी नंतर दुस-याच दिवशी येणारी ऋषीपंचमी हा महिलांच्या वतवैकल्याचा सोहळा साजरा करण्यात येतो.
याही वर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच कृष्णा नदीच्या काठावर महिला भाविकांनी स्नानपर्वणीसाठी गर्दी केली होती. देवी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भृगूऋषी मठावर समाधी स्थळ व उत्सवमूर्ती समोर अभिषेक, आरती झाल्यानंतर उपवासाच्या भात-भाजीचा महाप्रसाद घेऊन महिलांनी हा ऋषीपंचमीचा उत्सव साजरा केला. श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिष्य परिवाराने पौरोहित्य केले. भृगूमठ सेवेकरी, दत्त सेवेकरी, सदगुरू आण्णांच्या लेकी व महिला सेवेकरी, आचार्य भृगूमठ सेवेकरी, तिर्थक्षेत्र भुईंज युवा सेवेकरी यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.
उपस्थित महिलांना कौटुबिक वातावरण व मान सन्मान याविषयावर सद्गुरू आण्णांचे शिष्य प्रसिद्ध भारूड सम्राट ह. भ. प. लक्ष्मण राजगुरू महाराज यांचे प्रवचन झाले उपस्थितांचे स्वागत जेष्ठ महिला सेवेकरी राजश्री भोसले पाटील यांनी केले तर प्रास्ताविक भैय्यासाहेब जाधवराव यांनी केले. आभार प्रकाश उर्फ नाना खरे यांनी मानले कार्यक्रमास विविध संस्थांचे, पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.
कृष्णा नदीपात्रात नुकताच आलेला पूर व नदीपात्रात वाढलेले पाणी विचारात घेऊन भुईज येथे ग्रामस्थांच्यावतीने महिलांच्या स्नान पर्वणीसाठी महिलांचे दक्षता पथक तैनात ठेवले होते तर भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे व महिला सहकारी टीमने विशेष सुरक्षा पुरवली.
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा