बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरण येणार अंगल
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर शहरातील तर्डोबाची वाडी (मुक्ताईनगर) येथील एका सोसायटीतील ९६ सदनिकाधारकांच्या हक्काच्या पार्किंगच्या जागेची बेकायदेशीर विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सहाय्यक निबंधकांच्या आशीर्वादाने आणि काही सदनिकाधारकांना हाताशी धरून बिल्डरने पार्किंग जागेवर डल्ला मारल्याची गंभीर माहिती समोर आली असून, या प्रकरणात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कारवाई करत बिल्डरला जागा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदर पार्किंग जागेची विक्री कुठलीही अधिकृत परवानगी न घेता फक्त २६ लाख रुपयांना केली गेली, जेव्हा की तिची बाजारभावानुसार किंमत दीड कोटींपर्यंत आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, शिरूर उपअधीक्षक भूमी अभिलेख व तहसील कार्यालयाच्या मदतीने खोटे दस्तऐवज तयार करून ही जागा विकण्यात आली. यासंदर्भात मागील चार महिन्यांपासून दस्तऐवज मागवले असतानाही प्रशासनाने ते देण्यास टाळाटाळ केली आहे, जे निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २९ जुलै २०२५ रोजी बिल्डरला सदर जागा पूर्ववत करण्याचे लेखी आदेश दिले असून सात दिवसांत खुलासा मागवला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव सागर बंडू घोलप यांनी दोषी महसूल अधिकारी व बिल्डरवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे.
सत्य उघड करण्यासाठी लढा
या प्रकरणात केवळ आर्थिक घोटाळाच नव्हे, तर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर, खोटे गुन्हे दाखल करणे, धमक्या देणे, अल्पवयीन मुलींना त्रास देणे यासारखे गंभीर प्रकार घडले. तक्रारी असूनही शिरूर पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद राहिली आहे.
सागर घोलप यांनी स्पष्ट केले की, “हा लढा केवळ पार्किंगसाठी नाही, तर अन्याय, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील दडपशाहीविरुद्ध आहे. कोर्टात पुरावे सादर करून दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील.”
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा