शिरूर पोलिसांकडून तपास सुरू
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधि फैजल पठाण)
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गणेशनगर-गांजेवाडी परिसरात बुधवारी (दि. २०) सकाळी उसाच्या शेतात धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूमागे खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेके हे मंगळवारी (दि. १९) सकाळी ९ वाजता घराबाहेर पडले होते. नातेवाइकांच्या मते सकाळी ९.४५ च्या दरम्यान त्यांचा फोन सुरू होता. मात्र, त्यानंतर फोन बंद झाला. दिवसभर ते घरी परतले नाहीत किंवा संपर्कही झाला नाही. त्यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी शोध सुरू केला.
दरम्यान, फाकटे येथील एका युवकाने मंगळवारी (दि. १९) टेके यांना गणेशनगर-गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी (दि. २०) सकाळी नातेवाइकांनी त्या रस्त्याने जात शोध घेतला असता कवठे येमाई येथील गांजेवाडी रस्त्यावरील पोल्ट्रीशेजारी त्यांची दुचाकी सापडली. त्यानंतर दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर उसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या डोक्याला व मानेजवळ गंभीर जखमा असून, प्राथमिक पाहणीत खुनाचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कारंडे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या पुढील प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














