आयपीएस अधिकारी असूनही पोलिसांचा उरला नाही धाक
संपादकीय - सचिन कुलकर्णी
पंढरपुरात कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. काल पंढरपुरातील कालिकादेवी चौकात किरकोळ कारणावरून एका युवकावर कोयत्याने वार झाल्याची घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी गजानन महाराज मठाजवळ देखील अशाच प्रकारची घडलेली घटना ताजी असतानाच, आता आठवडाभरात ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांचा आणि कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून पंढरपुरातील सामान्य जनता दहशतीच्या छायेखाली वावरत आहे. सध्या पंढरपूरला कधी कुठे आणि काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही.
पंढरपूर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी खून खटल्याचा अजून छडा लागलेला नाही. त्यातील गुन्हेगार पकडले गेले नाहीत. असे असताना दुसरीकडे मात्र अशा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या एकूण कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. नुकतेच पंढरपूरला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आयपीएस अधिकारी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे आता पंढरपुरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना उलट घडताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस फक्त व्हीआयपी बंदोबस्त, दहीहंडी बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्त, यासाठीच आहेत का ? असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
एखाद्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली तरच अशा गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल मात्र एकीकडे तुरुंगातून जामीनावर सुटलेल्या गुन्हेगारांच्या जल्लोषात मिरवणुका निघत असून गुन्हेगारीचे उदातीकरण करण्याचा नवीन पायंडा पंढरपुरात पडला आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत नाही. यामुळे गुन्हेगार आणि समाजकंटक मोकाट सुटल्याचे चित्र सध्या भुवैकुंठ नगरी पंढरपूरमध्ये सर्वत्र दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरसाठी हे नक्कीच घातक आहे याची दखल पोलीस प्रशासन, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील काय? हा खरा प्रश्न आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














