३८ विद्यार्थ्यांची मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल्समध्ये निवड
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल्स यांच्या सहकार्याने मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले.
या ड्राईव्हमध्ये पुणे जिल्ह्यासह परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण १५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडली प्रथम गुणवत्ता चाचणी आणि शेवटचा टप्पा वैयक्तिक मुलाखत. या काटेकोर प्रक्रियेतून एकूण ३८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल्सकडून श्री. भव्य देसाई (मॅनेजर), श्री. अश्वानी गुप्ता (सिनिअर एक्झिक्युटिव्ह) आणि श्री. यश ओझा (ऑफिसर) हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचा कार्यक्षेत्र, प्रगतीच्या संधी तसेच व्यावसायिकतेसाठी आवश्यक कौशल्यांबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञानासोबत आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी हाच यशाचा खरा मंत्र आहे. त्यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “संस्थेचे ध्येय केवळ शैक्षणिक ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे आहे. यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सतत उद्योग-शिक्षण यामधील दुवा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध होतात.”
ट्रैनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. विजया पडवळ यांनी गेल्या वर्षभरात आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. जसे की इंडस्ट्री-इंटरॅक्शन सेशन्स, सर्टिफिकेशन कोर्सेस, औद्योगिक भेटी आणि नामांकित कंपन्यांबरोबर केलेले MOU. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि कौशल्यविकासाच्या जोरावर करिअर घडविण्याचे आवाहन केले.
यावेळी डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा व संस्थेचे समन्वयक श्री. शिवाजीराव पडवळ हे मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रियांका वांजुळ यांनी केले तर प्रा. प्रेरणा मोटे यांनी आभार प्रदर्शन केले. श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव श्री. धनंजयजी थिटे, डॉ. हर्षवर्धनजी थिटे आणि समन्वयक श्री. शिवाजीराव पडवळ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा