नांदेडसिटी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
पुणे – कोल्हेवाडी येथे गाडी घासल्याच्या कारणावरून झालेल्या वादात थेट हवेत तीन गोळ्या झाडून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला नांदेडसिटी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली होती. गोळीबार करून आरोपी फरार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी खबरदारीने शोध मोहीम राबवली.
पोलिस अंमलदार स्वप्नील मगर, बंटी मोरे आणि संग्राम शिनगारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित आरोपी खडकवासला चौपाटी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. माहिती वरिष्ठांना कळवण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिथे संशयितपणे थांबलेल्या सहा इसमांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे साहिल अरविंद चव्हाण (वय २४), अभिजीत राजू चव्हाण (वय ३१), प्रशांत यशवंत चव्हाण (वय ३४), आकाश भीमा चव्हाण (वय २४), गितेश शंकर जाधव (वय २०) आणि मंदार यशवंत चव्हाण (वय ३९) हे सर्वजण खडकवासला व कोल्हेवाडी परिसरातील रहिवासी आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिक्षेत्र ३ श्री. संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक कसबे आणि अंमलदार संग्राम शिनगारे, प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, भिमराज गागुर्डे,सतीश खोत, पथकाने केली.
या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला आळा बसला असून नागरिकांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा