गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीस दल सज्ज
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाच्या गणेशोत्सवाची आज पासून सुरुवात होते आहे. गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या वाईनगरीमध्ये सकाळपासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात, थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे. भाविक भक्ती भावात न्हाऊन निघाले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत नागरिक बाप्पाला घरी घेऊन जाताना दिसत आहेत. गणेशोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. उत्सवमूर्ती थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत. त्याठिकाणी विधीवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात येईल. आज पासून राज्यभरात पुढील १० दिवस गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
वाईसह तालुक्यातील सगळ्या मोठ्या गणपती मंडळामध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील मंडई परिसर तर गर्दीने फुलून गेला आहे. दीड दिवसांचा, पाच दिवसांचा, दहा दिवसांच्या घरगुती गणपत्तीचे आगमन आज होत आहे. वाईकरांच्या हृदयातील सर्वात मोठा सोहळा श्री गणेशोत्सव यंदाही दिमाखात साजरा होणार आहे. शहरात ३१३ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. हा उत्सव पाहण्यासाठी वाई शहर, ग्रामीण भागातून हजारो भाविक येत असून, वाई पोलीस दलाने व्यापक सुरक्षेचे नियोजन केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीस दल सज्ज झाले असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, वाई पोलीस दलाचे ३२ पोलीस कर्मचारी, ३ अधिकारी, ३४ होमगार्ड व एसआरपीएफ ची तुकडी अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील पोलीस दलाची करडी नजर राहणार असुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर पोलीस फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करणार आहेत. तसेच एखादी आक्षेपार्ह पोस्ट एखाद्या व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल होऊन त्यावर चॅटिंग झाल्यास व्हाट्सअप एडमिनवर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले आहे.
सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सण आनंदात पण शांततेत साजरा करावा, कायद्याचे पालन करावे असे आवाहन पो. नि. जितेंद्र शहाणे यांनी केले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा