विधीवत प्राणपतिष्ठा करून बापची स्थापना
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी (प्रतिनिधी गोविंद आढाव)
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत राहुरी शहरासह तालुक्यात घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विधीवत पुजनाने प्राणपतिष्ठा करून अकरा दिवसांसाठी विराजमान झालेल्या गणरायांच्या आगमनाने सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २७ ऑगस्ट पासून राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली. शहरात दोन दिवस गणेश मुर्ती व सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत भावीकांची प्रचंड गर्दी दिसून आली होती. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण व मंत्रोच्चार अशा मंगलमय वातावरणात घराघरांत, सार्वजनिक गणेश मंडळात काल गणराय विराजमान झाले.
यंदा पाऊस चांगला होत असल्याने शहरासह तालुक्यात बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह दिसून आला. सायंकाळी वरुण राजाने देखील गणरायाच्या स्वागत प्रसंगी हजेरी लावली. शहरात सिल्वर किंग म्हणून ओळख असलेल्या श्रीरामदत्त मित्र मंडळ तसेच श्रीदत्त मित्र मंडळ, गजानन तरुण मंडळ आदि अनेक मंडळांनी श्री मूर्तीची पारंपरिक वाद्य लावुन वाजत-गाजत मिरवणूक काढून विधीवत पुजनाने प्राणपतिष्ठा करून मुर्तीची स्थापना केली.
राहुरी शहरातील मानाचा गणपती आजाद तरूण मंडळात जय सुराणा व डाॅ. सौ. सेजल सुराणा, श्रीरामदत्त मित्र मंडळात प्रकाश दहिवाळकर व सौ. मिनाक्षी दहिवाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. त्याच बरोबर मळगंगा तरूण मंडळ, व्यंकटेश तरूण मंडळ, सातपीर बाबा मित्र मंडळ, केशर मित्र मंडळ, बुवासिंद बाबा मित्र मंडळ, श्रीराम तरूण मंडळ, ज्ञानेश्वर मित्र मंडळ, वाल्मिक तरूण मंडळ, महावीर गणेश मंडळ आदींसह शहरात एकूण १५ तर तालुक्यात एकूण १२९ लहान मोठ्या मंडळांनी सार्वजनिक गणेशाची मोठ्या उत्साहात विधीवत प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली. दरम्यान तालुक्यातील नऊ गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा