आंदोलनाला पाठिंब्यासाठी रविवारी निघोज बंद व रस्ता रोको
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
शनिवारी या उपोषणाचा ४ था दिवस असून या कालावधीत पोलीस प्रशासन वगळता, पारनेर तालुका आणि नगर जिल्हा पातळीवरील एकाही शासकीय अधिकाऱ्यांने लक्ष दिले नाही, किंवा साधी विचारपूस ही केली नाही. निघोज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते रुपेश ढवण यांची आरोग्य तपासणी केली. त्यांचा बी पी वाढला आहे आणि वजन घटले असून थकवा जाणवू लागला आहे.
राज्यात सत्तेवर असलेल्या सध्याच्या महायुती शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्ज माफी, कांदा भाव वाढ, कांदा निर्यात खुली करणार, शेती मालाला हमी भाव, या व इतर प्रश्न सोडवण्याचा दिलेला शब्द, सत्तेवर येताच दुर्लक्ष केले. त्यात निसर्गाने गरज नसताना उन्हाळ्यात भरपूर पाऊस दिला. आता पिकांना पावसाची गरज असतानाही पाऊस नाही. पिके सुकून गेली, अक्षरशः पिके करपली आहेत. त्यात कांद्याला भाव नाही. परिणामी बाजार पेठेवर त्याचा फार मोठा परिणाम झाल्याने व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यांचा लहान मोठ्या व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
याला कारणीभूत शासनाचे चुकीचे धोरण ठरले आहे. यामुळे निघोज सारख्या ग्रामीण भागातून रुपेश ढवण सारख्या शेतकरी पुत्राने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेत, अहिंसात्मक मार्गाने आमरण उपोषणाचे हत्यार उपसत हे जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाच्या ५व्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी रविवार दि. २४ रोजी पारनेर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले निघोज गाव बंद ठेवण्यात येणार आहे. बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर जनतेतून उत्सफुर्त रस्ता रोको करण्यात येणार आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा