पावसाळ्यात साथीच्या रोगांचा धोका वाढला; सुविधांचा अभाव ठोसपणे जाणवतो
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग मोठ्या प्रमाणात फैलावत असताना, बाजार समिती परिसरात प्रतिबंधक उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येते आहे.
बाजार समितीत गटारांची गैरसोय, उघड्यावर पडलेला कचरा, आणि सडलेला भाजीपाला यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे. कचरा टाकण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था असली तरी कचरा ट्रॉलीमध्ये टाकला जात नसून, तो ट्रॉलीच्या खाली साचत आहे, त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
साथीच्या रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी फवारणी किंवा बीएससी पावडरचा उपयोग केला जात नाही. यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होणार आहे.
शेतमाल विक्रीच्या वेळांमध्ये गोंधळ दिवसभर बाजार समितीचा कारभार चालू असतो शेतकरी कधीही माल घेऊन येतो त्यामुळे बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्रीसाठी निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना माल खूप कमी दरात विकावा लागतो, हे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही
- शेतकरी वर्गाकडून बाजार समिती प्रशासनाकडे पुढील गोष्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
- प्रतिबंधक फवारणी व बीएससी पावडरचा वापर
- नियमित कचरा व्यवस्थापन
- सडलेला भाजीपाला व्यवस्थीत गोळा करून नष्ट करणे
- शेतमाल खरेदी-विक्रीसाठी ठराविक वेळ निश्चित करणे
शेतकरी म्हणतात की, “आम्ही आपल्या ताटात अन्न वाढणारे पोशिंदे आहोत, पण बाजार समितीमध्ये आमचं आरोग्य धोक्यात आहे. वेळेवर काहीच ठरत नाही, आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे.” प्रशासनाने व बाजार समिती संचालकांनी बारकाईने लक्ष घालावे
बाजार समितीमधील ही स्थिती अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होनार आहे. यावर तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी एकमुखी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा