बेकायदेशीर खडी क्रशर विरोधी लॉन्ग मार्चमधील महिलांचा निर्धार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आज लॉंग मार्च च्या आठव्या दिवशी कुसगाव एकसर व्याहळी बोरीव या तीन गावातील आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या महिलांनी सरकार विरोधी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा निर्धार केला.
ज्या राज्य शासनाला मागच्या आठ दिवसांमध्ये आमची थोडीही दया आली नाही ज्यांना आमच्या डोळ्यातील अश्रू, आम्हाला होणारा त्रास दिसला नाही ते सरकार आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करू शकत नाही त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारा सन्मान निधी नको असा निर्धार महिलांच्या वतीने करण्यात आला.
आज सुस रोड पासून वाकड पर्यंतचा आजच्या दिवसाचा १२ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत वाई पासून ११६ अन किलोमीटर अंतर आंदोलनकर्त्यांनी पूर्ण केल. आजही वाई तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी लॉन्ग मार्चला आपला पाठिंबा दर्शवला.
या लॉंग मार्चला पश्चिम भागासहीत वाई तालुक्यातील सर्व स्तरावरून पाठिंबा मिळताना दिसत आहे. वाई तालुक्यातील घराघरात गल्लीबोळात चौका चौकात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. आंदोलनकर्त्यांचे होणारे हाल वर्तमानपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे.
अनेक संस्था वाई तालुक्यातील अनेक युवक वैयक्तिक स्तरावरती या आंदोलनाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या राहण्याच्या सोयींपासून ते जेवणापर्यंत सर्व सुविधा पुरवण्याचे जोरदार नियोजन गावागावात सुरू आहेत. ज्यांना आंदोलन स्थळी येता येत आहे ते त्या ठिकाणी पोहोचत आहेत ज्यांना शक्य नाही ते वेगवेगळ्या स्वरूपाने या आंदोलनाला मदत करत आहेत.
मात्र आंदोलनकर्त्यांच्या वेगळ्याच मागणीने तालुक्यातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आज आम्हाला जेवण पाणी राहण्याच्या सोयीपेक्षा तुमच्या आमच्या सोबत या लॉंग मार्चमध्ये येण्याने आम्हाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल अशी भावनिक साद या आंदोलनकर्त्यांनी वाई तालुक्यातील नागरिकांना घातली आहे यावर येणाऱ्या काळात कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा