आंदोलनाला वाईकरांचा वाढता पाठिंबा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मागील सहा दिवसांपासून १०० किमी पायी चाललेल्या या स्टोन क्रेशर विरोधातील लाँग मार्चला पुणे येथील विभागीय आयुक्त सन्मानपूर्वक तोडगा काढू शकतील अशी आशा आंदोलनकर्त्यांबरोबरच संपूर्ण वाई तालुक्याला लागून होती. मात्र आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेमध्ये आयुक्तांनी यावर सातारा जिल्हा अधिकारीच निर्णय घेऊ शकतील अशी माहिती शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत दिली. आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटल्यावर त्यांनी कागदोपत्री आपली भूमिका आयुक्तांसमोर मांडली. दगड खाण व क्रशर बेकायदेशीर असल्याबाबत सर्व पुरावे आयुक्तांना दाखवण्यात आले. हे सर्व बघितल्यानंतर आयुक्त यांनी आपण पुन्हा सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागावे असे मिश्किल वक्तव्य केले.
यावर आंदोलक संतप्त झाले व बैठक संपल्यावर पोलिसांनी आम्हाला अटक करावी म्हणत पोलिस गाडीत चढले. पोलिसांनी आंदोलकांचे सांत्वन करत आपण कायदेशीर आंदोलन करत रहा अशी विनंती आंदोलकांना केली. शिष्टमंडळामध्ये स्वप्निल गायकवाड,विराज शिंदे, विकी पार्टे, स्मिता वरे, अजित वरे, रुपेश पार्टे, धनश्री पार्टे इत्यादी उपस्थित होते.
एका बाजूने शासन आंदोलनकर्त्यांना सहकार्य करताना दिसत नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे मात्र दुसऱ्या बाजूने वाई तालुक्यातून आंदोलनास पाठिंबा वाढताना दिसत आहे. आज वाई तालुक्यातील अनेक लोक लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाले. यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्राबरोबर सर्वसामान्य नागरिक सुद्धा या लॉन्ग मार्च मध्ये दिसून आले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने याची दखल घेतली नाही तर वाई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईच्या दिशेने लॉंग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी येऊ शकतात.
आजच्या लॉन्ग मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने डॉक्टर नितीन सावंत यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर शिवसेना पक्षाकडून विकास आण्णा शिंदे,प्रदीप माने, रवींद्र भिलारे उपस्थित होते त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून मावळा प्रतिष्ठान यांच्यासारख्या अनेक सामाजिक संघटनांनी आपले समर्थन या लॉन्ग मार्चला लेखी स्वरूपात दिले आहे. शासनाच्या चुकीच्या वागणुकीमुळे आंदोलनकर्त्यांनी आजचा मुक्काम रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा