आरोपी पतीला कोर्टाने सुनावली फाशीची सजा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आज वाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी अरुण परबती बिरामणे (वय ३८, रा. वाघजाईवाडी, ता. वाई ) याला फाशीची सजा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरुण परबती बिरामणे हे पत्नी नीलम अरुण बिरामणे वय २६ व पत्नीची बहिण वर्षा दत्तात्रय जाधव वय २२ यांच्यासमवेत बोपर्डी येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. सौ निलम बिरामणे व वर्षा जाधव या एमआयडीसी वाई येथे कामास होत्या. तर अरुण बिरामणे हे वाघजाईवाडी येथे येऊन जाऊन शेती करीत होते. चारित्र्याच्या संशयावरून अरुण बिरामणे यांनी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चाकूने पत्नी सौ. नीलम हिच्या छातीवर, हातावर, पोटावर वार केले. यावेळी मेहुणी वर्षा ही सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिच्याही छातीवर व हातावर चाकूने वार केले. यामध्ये सौ. नीलम ही जागीच ठार झाली तर मेहुणी वर्षा ही गंभीर जखमी झाली.
यावेळी झालेल्या गोंधळामुळे घरमालक व शेजारी यांनी घराचा दरवाजा वाजवून काय प्रकार आहे असे विचारले. मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी रूमचा पत्रा उचकटून आत पहिले असता दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच्या दिसून आल्या. यावेळी आरोपीने तेथून पळ काढला. घरमालक ज्ञानेश्वर तुकाराम गाढवे यांनी पोलिसांना याबाबत सांगितले व ऍम्ब्युलन्सला फोन केला.
याकामी सरकारी वकील ए. आर. कुलकर्णी यांनी तर आरोपीच्यावतीने सौ. एन. एम. मोकाशी यांनी काम पाहिले. तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक बी. डी. होवाळ यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाच्यावतीने वीस साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपीस मरेपर्यंत फाशी तर धारदार शस्त्राने हल्ला केल्याबद्दल जन्मठेपेची सजा सुनावली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा