भुईंजच्या गोपाळ समाजातील चिमुकल्यांसाठी 'निर्माण' संस्थेने सन्मान केंद्र उभारून जपली सामाजिक बांधिलकी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
खरे तर शिक्षणाचा उजेड त्यांच्या झोपडीपर्यंत कधीच पोहोचला नव्हता. खाण्या-पिण्याची आबाळ, पालकांची फरपट, गरिबीची किनार, आणि जगण्यासाठीची भटकंती यामुळे त्यांच्या मायबापांनाही कधी शिक्षणाची गोडी वाटली नाही. मात्र भुईंजच्या गोपाळ समाजातील ही मुले शिकावीत यासाठी त्यांना शाळेत आणण्याबरोबरच ओळख देणारी 'आधार कार्ड' मिळवून देण्यासाठी शिक्षकांबरोबरच निर्माण संस्थेने सन्मान केंद्र उभारण्याबरोबरच शाळेतील प्रवेशाचा आणि उज्वल भविष्याचा मार्ग सुकर करून अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिढ्यानपिढ्या शिक्षणाचा गंधही लाभला नाही, अशा भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण संस्था गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. त्यातूनच शाळा सोडणाऱ्यांपासून स्वप्न पाहणाऱ्यांपर्यंतची ही यशोगाथा साकारली आहे. भटके विमुक्त समाजातील पाच जिद्दी मुलांचा परिवर्तनमय प्रवास घडवण्यासाठी निर्माण संस्थेने दिलेले योगदान निश्चितच समाजसेवेतील कळसाध्याय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वास्तविक तुम्ही कधी विचार केला आहे का? की, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी "शाळा" म्हणजे काय असते? त्यांच्या दृष्टिकोनातून शाळा म्हणजे एक स्वप्न, एक आशा... आणि काही वेळा, एक आव्हानसुद्धा. अगदी त्याच पठडीत वाई तालुक्यातील भुईंज या महामार्गालगतच्या गावातील गोपाळ समाजातील शिवानी, कृष्णा, साहिल, चांदणी आणि लक्ष्मी ही पाच मुले आपले बालपण जगत होती.
भटके विमुक्त समाजातील असल्याने त्यांची घरे रोजंदारीवर चालणारी, स्थलांतरितच. जिथे उद्या कुठे असू?, हे कोणालाच माहीत नसते. मूलभूत गरजांची टंचाई, आणि त्याहून मोठे संकट म्हणजे, शिक्षणाच्या दाराशी असलेला अडथळा- "अर्थात कागदपत्रांचा अभाव". ही कोवळ्या वयातील पाच मुले दररोज इतर मुलांना शाळेत जाताना पाहायचे, आणि स्वतःसाठीही तसंच आयुष्य मनात रेखाटायचे. पण घरची परिस्थिती, समाजातील उदासीनता आणि शासकीय प्रक्रियेतील अडथळे, यामुळे शाळा त्यांच्यासाठी केवळ एक स्वप्न बनून राहिली होती.
“पण मग एक आशेचा किरण आला "निर्माण" संस्थेमार्फत”. शाळेपासून दूर असलेल्या मुलांसाठी 'निर्माण'ने भुईंजमध्ये उभारलेले "सन्मान केंद्र" म्हणजे शिक्षणाचा प्रवेशद्वार ठरले. ही मुले केंद्रात येऊ लागली. खेळात, गप्पांमध्ये, रंगकामात आणि सर्जनशील शिक्षणात रमली. त्या संवादात्मक सत्रांनी त्यांच्यातील संकोच दूर केला आणि शिकण्याची खरी मजा काय असते, हे त्यांना कळू लागले.
पण एक मोठा प्रश्न अजूनही होता तो आधार कार्डशिवाय शाळेत प्रवेश कसा मिळणार?.. इथे 'निर्माण'च्या टीमने पुढाकार घेतला. त्यांनी पालकांशी अनेकदा संवाद साधला व शिक्षणाच्या महत्त्वावर चर्चा केली, त्यांचं मन जिंकलं. शाळा प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून, गरज आणि न्याय दोन्ही अधोरेखित करत, मुलांच्या प्रवेशासाठी मागणी केली. या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, भुईंज, ता. वाई, जि, सातारा या ज्ञानमंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. सविता जगताप मॅडम यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
निर्माण संस्थेचे जिल्हा समन्वयक विक्रांत मोरे व चादनी चंदनशीवे यांच्या मदतीने, शाळा सोडलेली ही मुले आता मोठं स्वप्न पाहतात – आणि त्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे... या प्रवासातून हे शिकायला मिळतं की प्रत्येक मूल शिकू शकतं – फक्त त्याला संधी, साथ आणि विश्वास द्यावा लागतो तसेच सामूहिक प्रयत्न, सातत्य आणि जिद्द असेल, तर कोणतीही व्यवस्था बदलू शकते आणि सर्वात महत्त्वाचं – शिक्षण हा हक्क आहे, भिक्षा नाही.
ती पंचरत्न बनली रोल मॉडेल्स!....
शिवानी, कृष्णा, साहिल, चांदणी आणि लक्ष्मी ही पंचरत्ने आता शाळेचे नियमित विद्यार्थी आहेत. ते केवळ पुस्तकांमध्येच नव्हे, तर “सन्मान केंद्रातील” नृत्य, क्रीडा, आणि शालेय कार्यक्रमांमध्येही हिरिरीने भाग घेतात. सन्मान केंद्राशी त्यांचा आजही संपर्क आहे. ते आता इतरांसाठी रोल मॉडेल्स बनले आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा