पर्यटन वाहतूक वाढल्याचा परिणाम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई सुरुर रस्त्याचे काम सुरू असल्याने जोशिविहीर, ओझर्डे , सोनेश्वर, बगाड फाटा मार्गे सुरू वाहतूक सुरू असलेला रस्ता धोकादायक बनला आहे .वाईहून सुसाट येणारी वाहने ओझर्डे येथील वळणावर ओढ्यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित खात्याने रस्त्यावर सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनधारक व रहिवाशी ग्रामस्थ करीत आहेत.
वाई तालुक्यातील सुरूर येथील राष्ट्रीय महामार्गापासून वाई पाचगणी महाबळेश्वर व पुढे पोलादपूरकडे जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील वाहतूक सध्या महामार्गावरून सुरूर ,जोशिविहीर, पाचवड ते वाई अशी वळवण्यात आली आहे.तसेच महाबळेश्वर, पाचगणी येथून येणारी वाहतूक वाई,पाचवड ते पुणे, कोल्हापूरकडे जाण्यासाठी वळवण्यात आली आहे. दरम्यान ही वळवलेली वाहतूक त्या मार्गाने न जाता वाईहून निघालेली अवजड व हलकी वाहने बावधन ओढ्याच्या पुढे आल्यानंतर बगाड फाट्यावरून सोनेश्वर ओझर्डे मार्गे जोशिविहीर येथे महामार्गावर येत आहेत.तसेच पुणे, वाठार,फलटणहून येणारी वाहने ओझर्डे येथील ओढ्याच्या वळणावरुन सोनेश्वर, वाई महाबळेश्वरकडे जात आहेत.
सदरचा रस्ता सध्या होत असलेल्या पावसाने जागोजागी मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मातीचा खच, दगड, खडी, आले आहेत. खड्ड्यामुळे रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाली आहेत. रस्ताची गटारे बुजलेली आहे. रस्ता अरूंद असल्याने साईट पट्टी खचली आहे. रस्त्यावर माती, पाणी आल्याने वाहने घसरून अपघात घडत आहेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी झाल्याने वळणा-पिळनावरील रस्ता झाडामुळे दिसेनासा झाला आहे त्यामुळे समोरून येणारे वाहने कळत नाही व दिसत नाहीत. तसेच दिशा फलक झाडांच्या वेलीत गायब झाले आहेत. अशा प्रकारे हा रस्ता खराब झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागास नागरिकांनी सांगितले आहे. ओझर्डे येथून रस्ता सुरू होतानाच ओढ्याच्या पुलानजीक रस्ता खचला असून पूर्वी बांधलेले कट्टे रस्त्याखाली गेल्याने रस्ता वर कट्टे खाली अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाईकडून वेगात येणा-या कार वळणावर खोल ओढ्यात जाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे असुन पावसाचे पाणी रस्त्यावर वाहून पाण्याची छोटी मोठी तळी साचल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा