शासकीय दालनात वाढदिवस साजरा करणे आले अंगलट
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
८ जून २०२५ रोजी शासकीय कार्यालयीन वेळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाढदिवस साजरा झाल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य महासचिव फिरोजभाई सय्यद यांनी दिलेल्या लेखी तक्रार आणि व्हिडिओ चित्रीकरणाच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांना कडक शब्दांत खडसावले आहे.
दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी, कमलाकर हट्टेकर, (उपसंचालक, भूमी अभिलेख, संलग्न जमाबंदी आयुक्त, पुणे) यांनी आपल्या शासकीय दालनात कनिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला होता. त्याच वेळी कार्यालयाबाहेर बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य महासचिव फिरोज सय्यद व इतर नागरिक त्यांच्या समस्या घेऊन उभे होते. मात्र तरीही शासकीय कार्यपद्धतीचा भंग करत कमलाकर हट्टेकर हे शासकीय दालनात केक कापून वैयक्तिक कार्यक्रम साजरा करत होते, त्याच ठिकाणी फिरोज सय्यद यांनी शिताफीने घडलेल्या प्रकाराची ताबडतोब व्हिडिओ चित्रीकरण करून घेतले आणि या बेजबाबदार अधिकार्यांना सर्वसामान्य नागरिकांची काय ताकद आहे हे दाखवून देण्याचा निर्धार केला आणि लगेचच आयुक्तांकडे लेखी तक्रार ही केली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी सुरवातीला तक्रारी कडे दुर्लक्ष केले परंतु बहुजन मुक्ती पार्टी च्या निरंतर पाठपुरावा आणि आक्रमक भूमिका बघून श्री हट्टेकर यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.
जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांच्या स्पष्ट सूचना
शासकीय कार्यालयांमध्ये किंवा कार्यालयीन वेळेत कोणतेही वैयक्तिक समारंभ करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार अयोग्य आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.” अश्या कडक शब्दात खडसावले आहे.
बहुजन मुक्ती पार्टीची आक्रमक भूमिका
या पत्रावर प्रतिक्रिया देताना बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य महासचिव फिरोजभाई सय्यद म्हणाले की, “या गंभीर प्रकाराची दखल घेण्यासाठी सुहास दिवसे यांनी तब्बल चार महिने का घेतले? शासन नियमांचे पालन करणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंधनकारक नाही का? असा खोचक सवाल सय्यद यांनी केला आहे.”
त्यांनी स्पष्ट इशारा ही दिला की, “या कारवाई वर आम्ही समाधानी नाहीत, श्री हट्टेकर यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अन्यथा आम्ही लोकायुक्त आणि मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार करणार आहोत. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत बहुजन मुक्ती पार्टीचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे असे सय्यद यांनी सांगितले.”
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
पुणे जिल्हातील अनेक प्रकरणांमध्ये, विविध तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापकांनी बिल्डर, भू-माफिया आणि धनदांडग्यांच्या सांगण्यावरून नियमबाह्य मोजण्या करून नकाशे तयार केले आहेत आणि त्यावर नियमबाह्य पद्धतीने मोठ मोठ्या इमारती बनवण्याच्या परवानग्या सुद्धा मिळविल्या आहेत, असे गंभीर आरोप सय्यद यांनी केले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये वाद, न्यायालयीन खटले आणि मनस्ताप निर्माण होत आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सर्व सामान्य नागरिकांनाही या माध्यमातून पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, भुमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित आपल्या ही समस्या तक्रारी असतील तर निःसंकोचपणे बहुजन मुक्ती पार्टीशी संपर्क करावा, न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल.
आंदोलनाची तयारी
जर लवकरात लवकर हट्टेकर यांच्यावर कारवाई झाली नाही, तर जमाबंदी आयुक्त कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा सय्यद यांनी दिला असून पुणे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.
ही घटना केवळ कार्यालयीन नियमभंगाची नसून, सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रातिनिधिक उदाहरण ठरत आहे. प्रशासनाने तत्काळ आणि पारदर्शक कारवाई केली नाही, तर जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे फिरोज सय्यद यांनी सांगितले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा