लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात वाढतोय जनतेचा रोष
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यातील शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकार पुन्हा एकदा समोर येत असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे एकाच तालुक्यातील अनेक विभागांत खळबळ उडाली आहे. 2015 पासून 2024 पर्यंतच्या काळात झालेल्या कारवायांच्या मालिकेवर नजर टाकली, तर प्रशासनातील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
नवीन कारवाई - तहसील कार्यालयातील तलाठी आणि महसूल सहाय्यक रंगेहाथ पकडले
मंगळवारी दुपारी सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील तलाठी रावसाहेब काकडे आणि महसूल सहाय्यक मनोज झिने यांना ACB ने 7,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने आपली व भावाची मालमत्ता आईच्या नावे लावण्यासाठी तहसीलदारांकडून आदेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, आदेश देण्याच्या प्रक्रियेत टाळाटाळ केली जात होती आणि पैशाची मागणी वाढत गेली. सुरुवातीला काही पैसे दिल्यानंतरही पुन्हा लाच मागितल्याने तक्रारदाराने थेट ACB कडे धाव घेतली.
विशेष म्हणजे महसूल सहाय्यक झिने यांची कौटुंबिक परिस्थिती अतीशय बिकट आहे – आईचे नुकतेच निधन झाले असून वडील आणि पत्नी आजारी आहेत. दुसरीकडे तलाठी काकडे हे केवळ दोन महिन्यांवर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. आता या कारवाईमुळे त्यांच्या निवृत्ती आणि पेन्शनवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
भ्रष्टाचाराचा कळस - कोणतेही कार्यालय अपवाद नाही
सिंदखेडराजा तालुक्यातील तहसील, पंचायत समिती, भूमी अभिलेख, कृषी विभाग इत्यादी शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी लाच द्यावी लागते, ही आता खुलेआम चर्चा होऊ लागली आहे. सामान्य नागरिक कामासाठी कार्यालयात गेल्यास चकरा मारून थकतो आणि शेवटी ACB कडे दाद मागतो.
अलिकडील काही ठळक ACB कारवाया
12 एप्रिल 2024 – तहसीलदार सचिन जयस्वाल, चालक मंगेश कुलथे व शिपाई पंजाब ताठे यांना अवैध रेती सुरू करण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
16 जानेवारी 2023 – कृषी सहाय्यक हरिभाऊ डोणे यांनी महाडीबीटी अंतर्गत पावर विडरच्या अनुदानासाठी 3 हजार रुपयांची लाच घेतली.
2021 – एसडीओ कार्यालयातील दीपक गोरे यांनी प्रलंबित शासकीय बिले मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेतली.
11 मे 2023 – भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक जितेंद्र बेहरे यांनी वारस लावण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेतली.
2017 – तलाठी संजय चव्हाण यांना प्रलंबित प्रकरणात 5 हजार, तर भूमापक धनंजय घुगे यांना मोजणीसाठी 9 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पंचायत समितीचे अभियंता उबाळे बांधकामाचे काम मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अडकले.
सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीमुळे तहसील कार्यालय म्हणजे "क्रीम पोस्टिंग"
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेतीचे साठे उपलब्ध असल्याने येथे अवैध रेती उपसा आणि वाहतूक हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परिणामी, या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात पैसा फिरत आहे, आणि त्यामुळे सिंदखेड राजा तालुका तहसील कार्यालय मिळणे म्हणजे "क्रीम पोस्टिंग" समजले जात आहे.
ACB चा इशारा: "पुढचा नंबर कोणाचा?
ACB च्या या वाढत्या कारवाया ही इशाराच आहे – "पैशासाठी जनतेला त्रास दिलात, तर पुढचा नंबर तुमचाच असू शकतो." लोकसेवा करणे ही जबाबदारी आहे, संधी नाही. त्यामुळे आता तरी सर्व शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी सावध राहावे, कामासाठी आलेल्या लाभार्थ्यांना वेळेत सेवा द्यावी, आणि कोणत्याही स्वरूपाची लाच मागणे टाळावे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा