लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघातांची शक्यता
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंजवाट फुलेनगर, बदेवाडी, अनवडी, येथील वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत संताप वक्त होत असून कामाचा निपटारा करा, अन्यथा उद्रेकाला सामोरे जा, असा इशारा परिसरातील शेतकरी, वीजग्राहककांनी दिला आहे. भुईंजवाट परिसरातील कित्येक विद्युत पोल व सात ते आठ फूट जमिनीपासून लोंबकळणाऱ्या तारा अशा कित्येक ठिकाणी बघायला मिळत आहेत. यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुईज फुलेनगर परिसरात महावितरणने अनेक दिवसांपासून भोंगळ कारभार चालवत असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या चांगला पाऊस झाल्याने शेतकरी, जनावरे, मजूर व त्यांचे कुटुंबीय शिवारात वावरत असतात, अशा ठिकाणी वाकलेला खांब व लोंबकळणाऱ्या तारा यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही संबंधित विभागातील अधिकारी दुर्लक्षित करत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. यावर तात्काळ उपाय योजना न झाल्यास या परिसरातील शेतकरी आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत. या शिवारातून शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारा लोंबकळत असल्याने परिसरातून ये-जा करणाऱ्या लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी गावच्या अन्य भागातील अशा विद्युतवाहिन्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुर्घटना घडल्या आहेत. इतर पिकांसह ऊस पिकाचे जळून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. याची पुनरावृत्ती होण्याची भीतीही या परिसरात शेतक-यांकडून केली.वारंवार हेलपाटे मारूनही येथील कार्यालय प्रमुख अधिकारी उपलब्ध नसतात. यामुळे दाद कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित होत आहे. भविष्यात दुर्दैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली तर जबाबदार वीज वितरणाचे कर्मचारी असणार आहेत. असे सांगून येथील शेतकरी संतप्त असून आक्रामक बनले आहेत.
लवकरात लवकर भुईंजवाट फुलेनगर, बदेवाडी, अनवडी, येथील वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या तारा संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मागणी व होणारा अनर्थ टाळण्यासाठी दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद द्यावा नाहीतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा