पुरोहितांच्या मंत्रोचारात 25 बटुंचा उपनयन (मुंज) संस्कार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पेशवा युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर येथे सामुदायिक वृत्तबंध सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिनांक एक मे रोजी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील मनमाडकर सभागृहात 25 बटूंची पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिपूर्वक मौजी बंधन करण्यात आले.
हरिभक्त परायण मदन महाराज हरिदास यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला, मंत्रालयातील वर्ग एक राजपत्रित अधिकारी मंजुषा कुलकर्णी, जयवंत शुगरचे अध्यक्ष सी.एन. देशपांडे, इत्यादी प्रमुख पाहुणे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक, चेअरमन कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे, मंगळवेढा अर्बन बँक शाखा अधिकारी माधुरी बडवे, इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर प्रेसिडेंट ऋतुजा उत्पात, उद्योजिका मंजिरी परिचारक, शेनवड गुरुकुलम चे वेदमूर्ती अजिंक्य झेंडे, गुरुकृपा ट्रॅव्हल्स चे अमित गंडाळे, रेणुका प्रतिष्ठानच्या संचालिका प्रियांका देशपांडे, या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात 16 संस्कार सांगितले आहेत त्यापैकी मौजी बंधन अर्थात उपनयन संस्कार हा सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. त्यानंतर बटू हा बारा वर्ष शिक्षण घेण्यासाठी गुरुग्रही जात असतो. या काळात बटने अतिशय कडक ब्रह्मचर्य पाळून ज्ञानार्जन करायचे असते. आणि एक सुसंस्कृत उच्चशिक्षित वेदशास्त्र संपन्न व्यक्ती होऊन गृहस्थाश्रमी येऊन पुरुषार्थ करायचा असतो. त्यामुळे पेशवा युवा मंचच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडपणे अनेक बटूंचा मोफत उपनयन संस्कार करून दिला जातो. आजपर्यंत जवळपास 750 बटूंचे व्रत्तबंध पेशवा युवा मंचने केले आहेत.
समाजासाठी पेशवा युवा मंच करत असलेले कार्य कौतुकास्पद आणि समाज हिताचे आहे. या कार्यासाठी मी पेशवा युवा मंचला शुभेच्छा देतो, असे जयवंत शुगरचे अध्यक्ष सी.एन. देशपांडे म्हणाले.
मुंज विधी पूर्ण झाल्यानंतर बटू सोबत आलेले पालक आणि नातेवाईकांना मिष्ठांन्न भोजन देण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेशवा युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानराज बेणारे, उपाध्यक्ष मंगेश कवडे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि समाज बांधवांनी जवळपास एक महिना परिश्रम घेतले आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा