सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सांगोला (प्रतिनिधी महादेव भोसले)
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रध्देय डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर, विधानसभेचे उपसभापती आण्णा दादू बनसोडे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर, ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणितीताई शिंदे, आम. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
सांगोला महाविद्यालय सांगोला या ठिकाणी गुरुवार दिनांक 10 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरास उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भेट देणार आहेत. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण व लोकार्पण करणार आहेत. तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला पटांगणामध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिंदे साहेब संबोधित करणार आहेत. यासह पत्रकारांशी संवाद साधताना, 10 तारखेला सोन्याचा दिवस उगवणार आहे. आपल्या सर्वांच्या अभिमानाची तारीख आहे. मानव जातीला सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दिला. सर्वांना समान न्याय हक्क दिला, संविधान दिले आणि त्या संविधानामुळे आपण एकजूट आहोत. अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभा राहत असताना एक मनस्वी आनंद होत आहे. यामध्ये जयंती उत्सव मंडळाचा अभिमान वाटतो. एवढा मोठा पुतळा कोणाकडे न जाता उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कौतुक आहे. जातीपातीच्या पलीकडे मी आंबेडकर वादी आहे. यामुळे या कार्यक्रमाला सर्वात मोठा निधी दिला यामुळे मला आजही आनंद आहे. असेही मा. आम. शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
यावेळी किशोर बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, बापूसाहेब ठोकळे यांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करीत, तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाकडून 2 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला. यामुळे सदर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्याचा मानस जयंती उत्सव मंडळाचा होता. यामुळे सदर लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. हे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळे ते शक्य झाले असे सांगत त्यांचे आभार मानले. शेवटी हे फक्त बापूच करू शकतात असेही त्यांनी कौतुक केले.
या पत्रकार परिषदेसाठी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, शिवसेना तालुकाप्रमुख दादासो लवटे, मा. नगराध्यक्ष नवनाथ पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तानाजीबापू बनसोडे, किशोर बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, प्रा. संजय देशमुख सर, मा. नगरसेवक सतीश सावंत आदी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा