अवैध वाळू उपसा करण्यासाठी सख्खे भाऊ झाले पक्के वैरी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
खडकपूर्णा नदीमधील बेकायदेशीर रेती उपशाला विरोध केल्यामुळे सख्ख्या भावंडांच्या कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. धाकट्या भावाने थोरल्या भावावर कुऱ्हाडीने वार केले. १६ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास जऊळका येथे ही घटना घडली.
किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जऊळका (ह.मु. पिंपळगाव कुडा) येथील पांडुरंग उत्तमराव नागरे (४७) हा रेतीचा उपसा करायचा. मात्र, त्याचा मोठा भाऊ विष्णू नागरे (५०) याने विरोध केला. यातून संतापलेल्या पांडुरंग नागरेसह त्याची मुले पवन व अतुल तसेच पत्नी सत्यभामा यांनी विष्णू नागरे व कुटुंबीयांवर कुऱ्हाड, काठी व चाकूसारख्या हत्यारांनी हल्ला केला. यात विष्णू हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांचा मुलगा नंदकुमार नागरे (३२) व पत्नी गीताबाई यांनादेखील काठ्यांनी मारहाण करण्यात आली. नंदकुमार नागरेच्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीनुसार पिंपळगाव कुडा शिवारात असलेली शेती पांडुरंग नागरे व त्यांच्या कुटुंबीयांनी नावावर करून देण्यासाठी सांगितल्यावर दगडफेक करत वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचीदेखील तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विष्णू नागरे, नंदकुमार नागरे व कैलास नागरे यांनी फिर्यादी पवन नागरे यांचे वडील पांडुरंग नागरे व आई यांना शिवीगाळ केली. तुमचे शेत नावावर करून देत नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. तुम्ही जर शेतात पाय ठेवला तर तुम्हाला ठार मारू, अशा धमक्या दिल्या. फिर्यादी पवनचा भाऊ अतूल हा भांडण सोडवण्यासाठी आला असता विष्णू नागरे, त्यांचा मुलगा नंदकुमार नागरे, कैलास नागरे यांनी हातातील दगड फेकून फिर्यादीचे भावास मारले. त्यामुळे फिर्यादीच्या डोळ्यांना दुखापत झाली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा