महसूल विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील रेती तस्करीबाबत वारंवार आवाज उठविल्यानंतर महसूल प्रशासनाने काल रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून वाळूतस्करांवर धाडी घातल्या. या धाडीत ट्रॅक्टर, टिप्पर जप्त करण्यात आले असून, १४० ब्रास रेतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. दि. १८ एप्रिलच्या रात्रीपासून १९ एप्रिलच्या पहाटेपर्यंत हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईने वाळूतस्करांच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या गेल्या असून, वाळूतस्करांत घबराट पसरली होती.
सविस्तर माहिती,अशी की तालुक्यात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीबाबत वर्तमानपत्रात प्रसारित केल्याने महसूल विभाग खडबडून जागे झाले, आणि सिंदखेडराजा तालुक्यात दुसरबीड, हिवरखेड पूर्णा, निमगाव वायाळ येथेल बैठे पथक नियुक्त करण्यात आले. मात्र हे बैठे पथकच मॅनेज होऊन अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला चालना देत असल्याचा बातम्या सर्वच वर्तमानपत्रांमध्ये आणल्यानंतर महसूल विभागाने बैठे पथकातील संबंधित कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावली आहे.
कालच उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले, की तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक बंटा करण्यासाठी बैठे पथकासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी फिरते पथक नियुक्त केले आहे, आणि या दोन्ही पथकाने संयुक्त कारवाई करीत, रेतीमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्या नेतृत्वात १८ एप्रिलच्या रात्रीपासून १९ एप्रिलच्या पहाटेपर्यंत जोरदार ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत - दुसरबीड येथे अंदाजे १ ते १.२५ ब्रास रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्री ८.३० वाजता पकडले गेले. हे ट्रॅक्टर किनगावराजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सायाळा ते लिंगा रस्त्यावर अवैध रेती भरलेले टिप्पर रात्री १०.३० वाजता पकडले गेले,
जे पहाटे ३ वाजेपर्यंत ऑपरेशन करून अखेर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या टिप्परमध्ये अंदाजे ४ ब्रास रेती होती. दुसरबीड गावातच तीन ते चार ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा आढळून आला. अंदाजे ११० ते १४० ब्रास रेती जप्त करून संबंधित जमिनीच्या मालकांच्या सुपूर्दनाम्यावर ताब्यात देण्यात आली. या कारवाईत महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी प्रदीप मोगल, जयसिंग राठोड, श्रीकृष्ण निकम, थोरात, महसूल सेवक मदन वायाळ, समीर पठाण, दादाराव भुसारी, संजय आटोळे व संदीप किंगरे यांनी विशेष मेहनत घेतली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा