मनसेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्याच्या व्हिडीओ ने खळबळ; मनसेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी..!
शिरूर नगरपरिषदेतील एका कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्याचा एक हृदयद्रावक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर जातीय द्वेषातून अन्याय करत आहेत, याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
व्हिडीओमध्ये संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले की, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात एका विशिष्ट समाजातील कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य करून कामावरून काढण्याच्या, नोटीस देण्याच्या आणि घरी बसवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच मुकादम पदासाठी एका ठराविक समाजातील कर्मचाऱ्यांनाच संधी दिली जाते, तर उर्वरितांना गुलामासारखी वागणूक दिली जाते. काही कर्मचाऱ्यांना तर जेवणाची सुट्टीही दिली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्वच्छता निरीक्षकांकडून ठेकेदारांच्या संगनमताने ही मनमानी सुरू असून, मुख्याधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे कर्मचारी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे स्वच्छता विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, कामगारांमध्ये भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड आणि मनसेचे शहर सचिव रवी लेंडे यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात व्हिडीओतील आरोपांची तातडीने चौकशी करून सत्यता तपासावी, दोषी स्वच्छता निरीक्षकावर विभागीय कारवाई करावी आणि अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्येही तीव्र संताप असून, जर प्रशासनाने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर नगरपरिषदेच्या कामकाजावर जनतेचा विश्वास उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा