या गावातील नागरिकांच्या जिवितास धोका - ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सुरूर ते वाई रस्त्याचे चौपदीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. मात्र त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण आल्याने सदर वाहतूक जोशिविहीर व पाचवड मार्गे वळविण्यात आलेली आहे. या रस्त्याच्या कामामुळे सुरूर वरून वाईकडे जाणा-या दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले असून प्रसंगी प्रवाशांना जीवसुद्धा गमावावा लागल्याच्या तसेच जायबंदी झाल्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनचालक गुगलमँपवर पर्यायी रस्ता शोधत असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून कवठे ते वाई व बोपेगाव खानापूर मार्गे वाई हा रस्ता दाखविण्यात येत असल्याने सुरूर मार्गावरील सर्व वाहतूक या मार्गावर वळत आहे.
कवठे तसेच बोपेगाव या गावाच्या मध्यातून गेलेल्या या दोन्ही रस्त्यावरून सुसाट वेगाने चारचाकी वहाने तसेच खडीचे डंपर वाहतूक करत असल्याने दररोज कवठे, विठ्ठलवाडी, बोपेगाव, पांडे,ओझर्डे,खानापूर, शांतीनगर या गावात छोटे मोठे अपघात घडत आहेत. मात्र महाबळेश्वरकडे जाणारी चारचाकी वाहने सुसाट वेगाने या गोष्टीची तमा न बाळगता जात असल्याने कवठे व बोपेगावकरांच्या दारी कायम मृत्यू घोंघावत आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी याबाबत समाज माध्यमांच्यावर आवाज उठवल्यावर सुरुवातीला स्पीडब्रेकरच्या ऐवजी चार पांढरे पट्टे ठिकठिकाणी ओढून या परिसरातील लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार बांधकाम विभागामार्फत करण्यात आला.
या पट्ट्यांवरून टरर असा जोरदार आवाज करीत आहे त्याच वेगात वाहने जाऊ लागल्याने पुन्हा हा प्रयोग फसून लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागल्याने रबरी तीन स्पीडब्रेकर कवठे गावात शाळेच्या अंदाजे ५० मीटर अंतरावर बसवण्यात आले आहेत. मात्र या स्पीडब्रेकरपर्यंत सुसाट वेगाने वहाने येत आहेत व हा ५० मीटरचा टप्पा पार करून पुन्हा सुसाट वेगाने पुढे ५ किलोमीटर जात आहेत. त्यामुळे कवठे गावाच्या प्रवेश कमानीपासून पुढे दोन ठिकाणी, विठ्ठलवाडी वस्तीच्या दोन ठिकाणी त्याचपद्धतीने बोपेगाव, पांडे खानापूर ओझर्डे या गावात गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात स्पीडब्रेकर बसवणे गरजेचे आहे मात्र करोडो रुपयांचा खर्च रस्त्यावर करीत असतान शुल्लक स्पीडब्रेकरसाठी खर्च न करता या परिसरातील लोकांचा जीव रस्त्यावर टांगल्याची भावना परिसरात जनक्षोभ वाढवीत आहे.
नुकताच कवठे ते धनगरबुवा व बोपेगाव ते खानापूर हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविला गेला असल्याने व नवीन असल्याने वहाने सुसाट जात आहेत मात्र यावरून २० टणांचे अवजड वाहने खडीचे डंपर खूप मोठ्या प्रमाणात जात असल्याने रस्ता खराब होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सुरूरचा रस्ता नवा कोरा होणार व पुन्हा एकदा या परिसरातील लोकांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. याची दखल घेऊन अवजड वाहनांची वाहतूक या दोन्ही रस्त्यावरून थांबवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच एप्रिल महिन्यात वरील सर्व गावांच्या यात्रा येत असल्याने तसेच कवठे व पांडे या गावात बगाड यात्रा असल्याने बगाडाचा मार्ग या रस्त्यावरून जात असल्यामुळे पादचारी लोकांची प्रचंड गर्दी या रस्त्यावर असणार आहे.
त्यामुळे एप्रिल महिनाभर या मार्गावरील वाहतूक जोशिविहीर व पाचवड येथूनच करावी याबाबत ग्रामस्थ आग्रही आहेत. वास्तविकत: प्रतिवर्षी यात्रेच्या वेळी कवठे ते वाई रस्त्यावर दोन तीन तासांचे ट्रँफिक जाम असते आणि आत्ता ही वाहतूक सुरु राहिली तर हि गावेच वाहनांनी जाम होतील व परिणामी वादाचे प्रसंग उद्भवतील व यावर यात्रा कालावधीत नियंत्रण मिळवणे प्रशासनालासुद्धा कठीण होईल. दरम्यान सुरूर ते वाई रस्त्याच्या कडेला खूप जुने वड, पिंपळ, आंबा, जांभळीची झाडे असून जेसीबीच्या सहाय्याने या झाडांचे योग्य ठिकाणी पुनर्रोपण केले जावे याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मागणी करण्याबाबत कवठे येथील तरुणांनी ठरवले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा