सत्तेची धुंदी आणि पैशाच्या नशेचे किळसवाणे प्रदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, सांगोला
3 एप्रिल ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. हा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर स्वातंत्र्याची चाड असणाऱ्या, प्रत्येक माणसासाठी दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले. त्यामुळेच शिवपुण्यतिथी आपण दुःखद दिवस म्हणून आठवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो.
मात्र सत्तेची धुंदी आणि पैशाची नशा माणसाला संवेदनाहीन करते याचे उदाहरण नुकतेच दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथी दिवशी हलग्या तुताऱ्यांचा गजर, आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने सांगोल्याचा आसमंत उजळून निघाला होता. आणि शिव पुण्यतिथीच्या दुःखद दिवशी कुणाला आणि कशाचा एवढा आनंद झाला आहे असा प्रश्न शिवप्रेमींना पडत होता.
सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी हा योग जुळवून आणला होता. आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, तसेच सर्वपक्षीय नेते यांना एकाच मंचावर आणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला अतिभव्य स्वरूप देण्यासाठी पालकमंत्र्यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशे, हलग्यांचा कडकडाट सुरू होता. आणि त्यावर कडी म्हणून की काय पालकमंत्री सांगोल्यात दाखल झाल्यापासून कार्यक्रम सुरू होईपर्यंत आणि त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत फटाके वाजतच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी शिव पुण्यतिथी दिवशी आजी माजी आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांचा साक्षीने सत्ता आणि पैशाचा उन्माद शिवप्रेमींना वेदना देणारा होता हे मात्र नक्की. यावेळी पालकमंत्र्यांचे उद्गार सर्व काही सांगून जातात.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा