किनगावराजा पोलिसांची कारवाई - एकूण ७३,७७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि इतर तंबाखुजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करत असलेल्या इसमाला अटक करून एकूण ७३,७७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ग्राम वर्दडी बु., ता. सिंदखेडराजा येथे करण्यात आली.
ही कारवाई, दि. ३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५:१५ वाजता करण्यात आली असून, आरोपी गजानन पुंजाजी सोनुने (वय ४८, रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा) हा आपल्या दुचाकी (क्र. एमएच २८ वाय ५५५३) वरून संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्याच्या ताब्यातील लोखंडी पेटीत विविध प्रकारचे प्रतिबंधित गुटखा व पान मसाला सापडले. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा येथील अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वंसावे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमालाची तपासणी व नोंद केली.
या जप्त मुद्देमालात प्रिमीयम नजर १००० पान मसाला किंमत ६,८६०, प्रिमीयम राजनिवास सुगंधीत पान मसाला १८,०४८, प्रिमीयम झेड एल ०१ जाफराणी पान मसाला ४,७०४, केसर युक्त विमल पान मसाला ९,८७२, व्ही-१ सुगंधीत तंबाखू ४१८, गोवा १००० पान मसाला १,८७० अशा रूपयांचा प्रतिबंधीत तंबाखुजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ३०,००० रूपये, लोखंडी पेटी २,००० रूपये अशा एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ७३,७७२ रूपये इतकी आहे.
याप्रकरणी किनगावराजा पोलिस ठाणे येथे कायम अप क्रमांक ७३/२०२५ अंतर्गत बीएनएस कलम १२३, २२५, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ. गणेश डोईफोडे यांच्याकडे देण्यात आला आहे. ही कारवाई पो.हे.नि. विष्णू मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा