maharashtra day, workers day, shivshahi news,

आमची मने भ्रमित झाली आहेत, मग तर आम्ही मार खाणारच ना - पहलगाम दहशतवादी हल्ला

दहशतवाद्यांनी फक्त धर्म विचारला, जात, भाषा, प्रांत नाही

Pahalgam Terror Attack, kashmir, india, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, विशेष संपादकीय (डॉ.सचिन लादे)

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला व निरपराध हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले ही बातमी अत्यंत वेदनादायी व तेवढीच निषेधार्ह आहे. धर्म कोणता आहे हे जाणून गोळ्या घातल्या गेल्या, अनेक नवविवाहितांच्या स्वप्नांचा चुराडा करण्यात आला. नवविवाहितेच्या हातावरची मेहंदी व हातात भरलेला चुडा घातलेल्या अवस्थेतील आमच्या भगिनींना पाहून जीव पिळवटून गेला, मनाला प्रचंड वेदना झाल्या.अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होऊन आपल्याच देशात निरपराध हिंदूंना मारले जाते ही गोष्ट अत्यंत वेदनादायी अशीच आहे. या साऱ्या गोष्टी मनाला वाटत असतानाच दुर्दैवाने सोशल मीडियावर या दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी दुर्दैवाने वेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, वेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत व वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या गोष्टी पाहिल्यानंतर मात्र एकीकडे मनाला वेदना होत आहेत तर दुसरीकडे चीड - संताप येत आहे.

दहशतवाद्यांनी गोळीबार करताना तेथे केवळ धर्म विचारला. जात विचारली नाही, जातीचा प्रवर्ग विचारला नाही, भाषा कोणती बोलता हे विचारलं नाही अथवा आपण कोणत्या राजकीय विचारधारेचे आहोत हेही विचारलेलं नाही. केवळ आणि केवळ धर्म विचारूनच गोळ्या घातल्या. परंतु आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही हिंदू म्हणून एक व्हायला तयार नाही ही अत्यंत चिंताजनक अशीच गोष्ट आहे. एस.सी., एस.टी., ओबीसी, एनटी. कोण आहे याचा दहशतवाद्यांनी विचार केलेला नाही, त्यांच्या दृष्टीने आपण सर्वजण हिंदूच आहोत. परंतु हिंदू मात्र स्वतःला हिंदू मानायला तयार नाहीत ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. दहशतवाद्यांनी धर्म जाणून घेऊन गोळीबार केला असे प्रत्यक्षदर्शी सांगत असताना देखील या देशातील अनेक धर्मनिरपेक्ष म्हणविणारे लोक यावर देखील शंका घेऊन दहशतवादी असे करणारच नाहीत असे म्हणताना दिसून येतात व एक प्रकारे दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने नरसंहार केला त्याचा निषेध करायचा सोडून दुसऱ्या बाजूने ही गोष्ट तितकीशी गंभीर नाही असेच म्हणताना दिसून येतात. अनेक गोष्टींवर सातत्याने शंका घेणारी एक जमात या देशात मूळ धरून आहे, अशा जमातीतले लोक हिंदू, हिंदुत्व हा शब्द आला की त्यावर परखडपणे टीका करतात. भारतीय पर्यटकांना दहशतवाद्यांनी मारले अशी बातमी आली असती तर कदाचित अशा धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असता. परंतु हिंदू पर्यटकांना मारले म्हटल्यानंतर शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. यातून हिंदू म्हणून लोकांनी एक होऊच नये अशीच या लोकांची दुर्दैवाने भावना आहे. या लोकांना हिंदू - मुस्लिम भाई - भाई चालतात, परंतु हिंदू - हिंदू भाई - भाई चालत नाहीत.

सोशल मीडियावरून आणखी एक गोष्ट काही लोक व्यक्त करताना दिसतात, ती म्हणजे निवडणुका जवळ आलेल्या असाव्यात म्हणून दहशतवाद्यांनी हल्ला केला. राजकारणाच्या सोयीसाठी, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी कोणी काहीही करो परंतु निदान जे निरपराध लोक दुर्दैवाने मारले गेले आहेत त्यांच्या मृत्यूचे भांडवल तरी केले जाऊ नये. या दुर्दैवी घटनेमुळे कोणाचे संसार उध्वस्त झाले आहेत, लोकांना काय यातना सहन कराव्या लागल्या आहेत याचा विचार न करता या गोष्टीचा कोणत्यातरी राजकीय पक्षाला फायदा होईल याचे गणित मनामध्ये धरून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करणारे लोक दुर्दैवाने असवेदनशील आहेत असेच म्हणावे लागेल. राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाची सत्ता येवो अथवा जावो, याच्याशी सामान्यतल्या सामान्य व्यक्तीला काहीही देणे घेणे नसते, परंतु याच सामान्यांना लक्ष्य करून जर कोणी राजकीय पोळी भाजून घेत असेल तर आता समाजाने हाही डाव ओळखला पाहिजे. हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात प्रत्येकाने निषेध करायला हवा आहे? का याबाबत काही शंका उपस्थित करायला हव्या आहेत? याचा आता प्रत्येकाने विचार करायला हवा आहे. 

हिंदू पर्यटक मारले गेले म्हणून या देशातील प्रत्येकाला जे दुःख झाले आहे, त्या दुःखातून तो समाज संघटित होईल व या पुढच्या काळात अशा घटना करण्याचे धाडस दहशतवाद्यांकडून होणार नाही एवढी ताकद या संघटितपणातून निर्माण व्हावी तरच या मृतात्म्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. नेमकी हीच गोष्ट या देशातील धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्यांना होऊ द्यायची नाही म्हणूनच हे लोक अशा प्रकारच्या शंका उपस्थित करत आहेत व प्रतिक्रिया देत आहेत. हिंदू समाजाने हा धोका ओळखून आता एक व्हायलाच हवे आहे. आजपर्यंत अनेक नॅरेटिव्ह तयार करून समाजाला भ्रमीत केले गेले आहे, आमची मने भ्रमीत झाल्यामुळेच आम्ही कधी एक होऊ शकलो नाही, त्याचाच परिणाम म्हणून आम्हाला हिंदू म्हणून मार खावा लागला. आता तरी यातून धडा घेऊयात, संघटित होण्यामागचा आमच्या मनातील भ्रम दूर करूयात व एक होऊयात तरच खऱ्या अर्थाने आपण सेफ होऊ शकतो. आपण हिंदू म्हणून संघटित होणे म्हणजे कोणाच्या तरी विरुद्ध लढणे अथवा संघर्ष करणे असे नाही. आपल्या संघटित होण्याचा फायदा हा आपल्याला सेफ करण्यासाठी आहे, कोणाविरुद्ध लढण्यासाठी नाही, म्हणूनच आपण संघटित झाले पाहिजे. मग संघटित व्हायचे म्हणजे सर्वांनी हातामध्ये शस्त्रे घ्यायला हवीत, आंदोलने करायला हवीत अथवा रस्त्यावर उतरायला हवे असे नाही तर मनामध्ये हिंदुत्वाचा भाव जागृत ठेवून समरसमनाने सर्वांना आपले बांधव मानून तसा व्यवहार केला पाहिजे, सतत जागरूक राहून आपल्यावर येणाऱ्या संकटाला कसे सामोरे जाता येईल यासाठीची मनोभूमिका तयार केली पाहिजे व हिंदुत्व हे आमच्यासाठी आहे आम्ही हिंदुत्वासाठी आहोत ही भावना मनात दृढ केली तरच पुढच्या काळात असे दहशतवादी हल्ले कधीच होऊ शकणार नाहीत, सर्वांनी याचा जरूर विचार करायला हवा आहे. 

अतिथी संपादक     

- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

              मो.क्र.७५८८२१६५२६

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !