शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला गंभीर इशारा
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रशासक अरूण साकोरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर हे जाणिवपूर्वक शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.शिरूर शहर हे शिरूर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शेतमाल बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असल्याने सर्व शेतकऱ्यांना संध्याकाळी ५ ते ८ शेतमाल विक्रीची वेळ सोयीस्कर असताना केवळ कृषी उत्पन्न बाजारपेठेतील मोजक्या आणि धनदांडग्या व्यापाऱ्यांचे हित लक्ष्यात घेऊन, सायंकाळी भरणारा शेतकरी बाजार वेळ अचानकपणे पहाटे ४ वाजता करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिविताचा आणि आर्थिक अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या
१)शेतकरी यांना ४ वाजता भाजीपाला विकण्यासाठी येण्यासाठी निम्या रात्री घर सोडावे लागत आहे.रात्री चोरांची भिती, बिबट्यांचा हल्ला,खराब रस्त्यामुळे मध्यरात्री होणारे रस्ते अपघात असे अनेक धोके संभवत आहे.
२)शेतकरी यांच्या भाजीपाल्याला पहाटेच्या बाजारात योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने उत्पन्नाचा खर्च ही निघत नाही अशी अवस्था सध्या पहाण्यास मिळत आहे. परिणामी
गरिब शेतकरी अखंड कर्जात बुडेल आणि आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे.
३)बाजार समितीच्या आवारात शेतकरी बाजाराची प्रचंड अशी गैरसोय होत आहे.
४) पहाटे ४ वाजता शेतकरी बाजार वेळ केल्याने शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री बंद झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून अल्पदरात भाजीपाला विकत घेऊन व्यापारी मात्र ग्राहकांना अतिशय महाग दरात शेतमाल विकून सामान्य ग्राहकांना लुटत आहेत. त्यामुळे शहराच्या ठिकाणी शेतकरी बाजार असताना सुद्धा सामान्य ग्राहकांची लूट चालू आहे.
५)शेतकरी यांच्या भाजीपाल्याला व शेतकरी यांच्यासाठी उन्हं,वारा,पाऊस या पासून संरक्षण होण्यासाठी बाजार समिती आवारात कुठलीही सोय करण्यात आलेली नाही.
या संबंधित समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात व सदर शेतकरी बाजारचा टायमिंग हा तात्काळ प्रत मिळाल्या पासुन २४ तासात आदेश देऊन पूर्ववत संध्याकाळी ५ ते ८ करण्यात यावा अशी मागणी केली गेली आहे.
जर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला हा जुलमी नवीन निर्णय (पहाटेचा बाजार वेळ)रद्द केला नाही तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात दिनांक ७ मे २०२५ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सर्व शेतकरी यांना घेऊन शेतकरी हिताचे निर्णय होत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात बसुन धरणे आंदोलन करण्यात येईल. आणि सायंकाळी ५ वाजता शेकडो शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी बाजार रस्त्यावर भरविण्यात येणार आहे. असा गंभीर इशारा शेतकरी कृती समिती अध्यक्ष व शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला.
शेतकरी यांच्या प्रमुख मागण्या
१) २४ तासात शेतकरी बाजाराचा नवीन पहाटे ४ वाजताची बाजार वेळ रद्द करून पूर्वी सारखाच संध्याकाळचा ५ ते ८ ची वेळ शेतमाल विक्रीसाठी करावी.
२) शेतकऱ्यांनसाठी स्थापण झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्री करण्यासाठी योग्य सोईसुविधा विकसित करने.
३) शेतमाल घेऊन येणारे व शेतमाल खरेदी करणाऱ्या शेतमाल वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी योग्य पार्किंगची सोय करने.
४) शिल्लक राहिलेला शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्यासाठी कोल्ड स्टोअर ची सुविधा व सुरक्षा रक्षक यांची उपलब्धता करून देण्यात यावी.
५) शेतकरी यांच्या भाजीपाल्याला योग्य बाजारभाव यासाठी बाजार समिती ने व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन जास्तीत जास्त व्यापारी यांना शिरूर बाजारपेठेत येण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
६)बाजार समितीच्या आवारात असलेले अनाधिकृत शेड,ओटे काढून शेतकऱ्यांना प्रशस्त जागा उपलब्ध करून द्यावी.
७)कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील गाळ्यांच्या समोरील शेड,ओटे काढून मेन रोड लगत होणारी वाहतूक कोंडी सोडवणे.
८) स्थानिक बाजारपेठेत बाहेरील राज्यातून येणारे व्यापारी व शेतमाल या वर नियंत्रण करावे.जेणे करून स्थानिक शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल.
९) सामान्य ग्राहकांना सुद्धा योग्य दरात शेतकरी ते थेट ग्राहक ताजा भाजीपाला मिळावा व त्यांची होणारी आर्थिक लूट थांबली पाहिजे.
अशा स्वरूपाच्या मागण्या शेतकरी कृती समितीच्यावतीने करण्यात आलेल्या आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा