परदेशी पर्यटकांसह मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, बावधन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाची बगाड यात्रा मोठ्य़ा उत्साहात पार पडली. परदेशी पर्यटकांसह मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याच्या बावधन (ता. वाई) येथील प्रसिद्ध बगाड यात्रा दरवर्षी माघवद्य पंचमीला (रंगपंचमी) होते. गावातील भैरवनाथ मंदिरात होळी पौर्णिमेस ज्याच्या बाजूने कौल मिळतो, अशा बगाड्य़ास शिडावर चढविण्यात (बांधण्यात) येते.
या वर्षीचा बगाड्य़ा अजित ननावरे (वय ३९) याच्याकडून कृष्णातीरावरील सोनेश्वर येथे भैरवनाथ व ग्रामदैवतांची सकाळी साडेनऊच्या दरम्यान पूजा झाल्यावर सकाळी अकराच्या सुमारास बगाडास बैल जुंपण्यात आले. बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदैवताच्या पालख्या असतात. एका वेळी किमान दहा ते बारा बैल बगाडाच्या रथास जुंपण्यात येतात. वेगवेगळ्या शिवारात हे बैल बदलले जातात. सकाळी बगाड निघाल्यानंतर विविध शिवारात फिरत ते रात्री आठच्या दरम्यान बावधन गावात पोहोचले.
यावर्षी बगाड मिरवणुकीनिमित्त गावकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले होते. आज किमान तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी बगाडाचे दर्शन घेतले. रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिंम, वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अमोल गवळी, उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज यांच्यासह आठ पोलीस अधिकारी दंगाविरोधी पथक असे शंभरावर पोलीस तैनात करण्यात आले होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा