तपासणी अंती हे रहस्य आले समोर
शिवशाही वृत्तसेवा, बीडबीडच्या जिल्ह्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून साधारण पाव किलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आल्याने गावात खळबळ होती. यातील एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आला होता, तर दुसरा दगड शेतकऱ्यांच्या घराशेजारील गायरानात पडला होता. या घटनेनंतर अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ गावात दाखल झाले आणि त्यांनी हे दोन्ही दगड ताब्यात घेतले असून आकाशातून पडलेले दोन्ही दगड उल्का पिंड असल्याचं स्पष्टीकरण दिलंय.
लिमगाव येथील शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंभोरे यांच्या घरावर सोमवारी दुपारी अचानक मोठ्ठा आवाज आला. आपल्या घरावर नेमका कशाचा आवाज आला याची शोधाशोध केली असता, पत्र्याला छिद्र पडून खाली दगड पडल्याचे दिसलं. तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे. या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले होते. साधारण पाव किलो वजनाचा आणि एक काळ्या रंगाचा दगड आढळून आल्याने शेतकऱ्यासह परिसरात मोठे कुतूहल वाढले होते. शेतकऱ्याने दगडा संदर्भात ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाला कळवले होते. त्यानंतर वडवणीचे तहसीलदार वैभव महेंद्रकर, व तलाठी यशवंत यांच्या पथकाने पंचनामाही केला. खगोलीय अभ्यासकांनी भेट देऊन या दगडांची पाहणी केली. तेव्हा, साधारण 80 सेंटीमीटर आकाराचे हे उल्कापिंड असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे .
बीडमध्ये घडलेली घटना ही उल्कापात संबंधित असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आम्हाला प्राप्त झालेल्या फोटोवरून हे काँड्राइड स्वरूपाचा उल्कापिंड असल्याचं आढळून येत आहे. ज्या मुलांनी आकाशातून दगड खाली पडताना पाहिला त्यावरून तरी हा उल्कापात असावा असे वाटते असे, खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले. या उल्कापिंडांचा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांकडून परिक्षण व अभ्यास केला जाणार आहे. त्यांच्याकडून त्याचा विश्लेषण केल्यानंतर आणखी स्पष्ट माहिती मिळेल, असंही ते म्हणाले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा