सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी केली सोई सुविधांची पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
माघ एकादशीचा मुख्य सोहळा दि. 08 फेब्रुवारी रोजी असून, वारकरी भाविकांनी मंदिर परिसरात व दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन रांगेत 6 पत्राशेड उभारण्यात आले होते. मात्र, दर्शनरांगेतील भाविकांची गर्दी वाढली असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यासाठी 2 अतिरिक्त पत्राशेड नव्याने उभारण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दर्शनरांग व पत्राशेडच्या पाहणी करून आढावा घेतला. त्यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख बलभिम पावले, भिमाशंकर सारवाडकर, राजाराम ढगे, शंकर मदने व राजेंद्र घागरे उपस्थित होते.
चहा वाटपासाठी कागदी कपा ऐवजी स्टील कपाचा वापर
पदस्पर्शदर्शनरांगेतील वाढती गर्दी विचारात घेऊन, 2 जादा म्हणजे 8 पत्राशेड उभारणे, चहा वाटपासाठी कागदी कपा ऐवजी स्टील कपाचा वापर, मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपूल उभारणे तसेच जलद व सुलभ दर्शनरांग चालविणेकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना यावेळी सह अध्यक्ष यांनी दिल्या.
पत्राशेड येथे चांगली स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, आपत्कालिन व्यवस्थापन, दर्शनरांगेत मॅटींग, सार्वजनिक सुचना प्रणाली, स्पिकरवर अभंग आणि भक्तीगीते तसेच आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र तसेच दर्शनरांगेतील एकही भाविक उपाशी राहू नये म्हणून खिचडी वाटप व दशमी, एकादशी व द्वादशीला पत्राशेड येथे अन्नछत्र सुरू राहणार आहे. सह अध्यक्ष यांनी नियुक्त प्रशासकीय अधिकारी व दर्शनरांगेतील भाविकांशी चर्चा करून, सोई सुविधांचा आढावा घेतला व दर्शन रांगेतील भाविकांना पुरेशा प्रमाणात अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे सांगीतले.
पंढरीत दाखल झालेल्या भाविकांनी सध्या विठुरायाच्या दर्शनरांगेत मोठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत हजारो भाविक उभे आहेत, या वारकरी भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास मंदिर प्रशासन सज्ज असून, माघ शुद्ध जया एकादशी दिवशी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची नित्य पूजा अनुक्रमे मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत असल्याचे यावेळी श्री श्रोत्री यांनी सांगीतले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा