जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा वन भवन, गोडोली, सातारा येथे संपन्न झाली.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी स्थानिक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा सुनिशा शहा, ॲड. मनिषा बर्गे उपस्थित होत्या.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर म्हणाल्या, महिलांनी कोणताही दबाव न घेता पुढे होऊन त्यांचेवरील शोषणाबाबत तक्रार दाखल करावी तसेच प्रशिक्षणामध्ये प्राप्त होणारी माहितीचा अवलंब प्रत्यक्ष कामकाज करावा.
10 पेक्षा कमी अधिकारी,कर्मचारी असलेल्या शासकीय,खाजगी कार्यालयांकरीता जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच महिला जर त्यांचे कार्यालयामध्ये लैंगिक छळाला सामोरे जात असतील तर त्यांनी पुढे येऊन न घाबरता तक्रार करा प्रत्येक तक्रारींचे निवारण करण्यात येईल असे स्थानिक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांनी सांगितले.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये ॲड. मनिषा बर्गे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत विविध कलमांची माहिती दिली तसेच कामाचे ठिकाण, छळांचे प्रकार, तक्रार कोठे कशी करावी, अंतर्गत तक्रार निवारण समितीचे कार्य, तक्रारीचे निराकरण,स्थानिक तक्रार निवारण समितीचे कार्य याची सविस्तर माहिती दिली.
सदर प्रशिक्षण कार्यशाळा प्रास्ताविक संरक्षण अधिकारी अजय सपकाळ, यांनी केले. सदर प्रशिक्षण कार्यशाळेस सातारा जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयांमधील प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा