गावात संपूर्ण दारूबंदी करण्याच्या हालचालींना वेग
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी श्रीक्षेत्र पंढरपूर च्या अगदी नजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ने गावात दारूबंदी करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला. त्याला ग्रामस्थ बंधू-भगिनींनी हात उंचावून 100% मतांनी मंजूर केला.
लक्ष्मी टाकळीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, उपसरपंच रूपाली कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम, शेतकरी प्रतिनिधी सुरेश टिकोरे, विद्या विकास प्रतिष्ठानचे विलास देठे, पोलीस पाटील इरकल मॅडम, मोटिवेशन स्पीकर नंदकुमार दुपडे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, समाधान देठे, गोवर्धन देठे, आशाबाई देवकते, उद्योगपती आबासाहेब पवार, माजी सरपंच सचिन वाळके, नंदकुमार वाघमारे व विजयमाला वाळके, माजी उपसरपंच सागर सोनवणे, अनिल सोनवणे, महादेव पवार, तसेच ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून गावातील दारू बंद करावी या संदर्भात ग्रामस्थांची मागणी आणि निवेदने येत होती. यातील काही धंदे भर वस्तीत असल्याने एक तर ते बंद करावे किंवा स्थलांतरित करावे अशी मागणी नागरिक करत होते. त्यासाठी सरपंच संजय साठे यांनी हालचाली सुरू केल्या. सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्तता करण्यास सुरुवात केली. त्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली. या ग्रामसभेमध्ये दारूबंदी करण्यासंदर्भात पंचायतीने केलेल्या कारवाईची माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली त्यानंतर सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा ठराव मांडून त्यावर ग्रामस्थांचे मत विचारले असता, उपस्थित ग्रामस्थांपैकी शंभर टक्के लोकांनी हात उंचावून दारूबंदीच्या प्रस्तावाला समर्थन दिले. त्यानंतर गावात दारू विक्री चालू राहावी का असा प्रश्न विचारून त्यावर मतदान घेतले असता उपस्थित एकानेही त्या समर्थन दिले नाही. यावरून गावात दारूबंदी करण्याचा ठराव 100% मतांनी संमत झाला अशी घोषणा करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना, संपूर्ण राज्याने आपला आदर्श घ्यावा अशी आपली ग्रामपंचायत असून चांगल्या निर्णयाला गाव शंभर टक्के समर्थन देते ही कौतुकाची बाब आहे, असे सांगितले. तर अहो कारभारी म्हणून दारूबंदीचा आम्ही घेतलेला निर्णय गावकऱ्यांनी मान्य केला. त्याबद्दल सरपंच आणि उपसरपंच यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी लक्ष्मी टाकळी चे आजी-माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा