वेळीच सुधारणा करावी, अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कडक भूमिका घेतली आहे. शहरातील वायू प्रदूषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे MPCB ने नगरपरिषदेवर कठोर निर्देश जारी केले असून, 15 दिवसांत उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
MPCB च्या तपासणीत धक्कादायक बाबी उघड मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड व मनसेचे सचिव रवि लेंडे यांनी 27 जानेवारी 2025 रोजी MSW (म्युनिसिपल सॉलिड वेस्ट) साइटवरील प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी MPCB च्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली असता अनेक गंभीर नियमभंग समोर आले.
- कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन नाही
- अवैज्ञानिक पद्धतीने कचरा टाकला जात आहे
- काही ठिकाणी घनकचऱ्याचे जाळणे सुरूच
- वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- नगरपरिषदेला MPCB ची अंतिम संधी!
MPCB च्या प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत नगरपरिषदेकडून योग्य घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवली नाही तर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि हवेचे प्रदूषण प्रतिबंधक कायदा 1981 अंतर्गत कडक कारवाई केली जाईल.
नागरिकांचा संताप – “आरोग्य धोक्यात, कारवाई आवश्यक!”
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिरूरवासीयांनी नगरपरिषदेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रभर चर्चा – प्रशासनाचे डोळे उघडणार का?
या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक प्रशासनाची उदासीनता आणि नियमांकडे केलेला दुर्लक्ष संपूर्ण राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. आता नगरपरिषद MPCB च्या आदेशांचे पालन करते की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिरूर नगरपरिषदेने वेळीच सुधारणा करावी, अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे MPCB च्या प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी शिरूर नगरपरिषदेला पत्र द्वारे सांगितले. त्या संदर्भात आज मनसेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या सर्व बाबी त्यांनी सांगितले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा