साहित्य पुरस्काराचे वितरण, परिसंवाद व कवी संमेलन असा भरगच्च कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, आटपाडी
आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर यांच्या मूळ गावी माडगुळे येथील 'बामणाचा पत्रा' या निवासस्थानी रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी शिदोरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त गीतरामायणचे हिंदी अनुवाद करणारे दत्तप्रसाद जोग (गोवा) यांना गदिमा काव्यगौरव आणि जयवंत आवटे (कुंडल कथासंग्रह) यांना व्यंकटेश माडगुळकर कथागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आटपाडी तालुका साहित्य मंच, कडेगाव-खानापूर तालुका साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आटपाडी, माडगुळकर परिवार व ग्रामस्थ माडगुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी माडगुळे येथील बामणाचा पत्रा या ठिकाणी शिदोरी साहित्य संमेलनाचे सकाळी दहा वाजता मसाप आटपाडी शाखेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, ॲड. सुभाष पाटील, स्वागताध्यक्ष प्रसिध्द गझलकार सुधाकर इनामदार, सरपंच सौ. संगिता गवळी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
शिदोरी साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, ॲड.रविंद्र माडगुळकर, यांच्या हस्ते साहित्यिकांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. गोवा येथील दत्तप्रसाद जोग यांनी गीतरामायणाचे हिंदीत अनुवाद केले आहे. त्यांच्या पुस्तकाला ग. दि. माडगुळकर काव्यगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर कुंडल येथील जयवंत आवटे यांच्या बारा गावचं संचित या पुस्तकाला व्यंकटेश माडगुळकर कथागौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध कथालेखक सुनिल दवडे यांच्या 'बनगी आणि बिरमुट या ग्रामीण कथासंग्रहावर परिसंवाद होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध समिक्षक डॉ.सयाजीराजे मोकाशी आहेत. यामध्ये प्रा.श्रीकृष्ण पडळकर, दिनेश देशमुख, प्रसिद्ध साहित्यिक रघुराज मेटकरी सहभागी होणार आहेत.
तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार असून यामध्ये सुप्रसिद्ध कवी व कथाकथनकार प्रा. विश्वनाथ गायकवाड व उपस्थित सर्व कवींचा सहभाग असणार आहे.
साहेबराव चवरे, पुष्पलता मिसाळ, मेघालाई पाटील, अरूणा चव्हाण, आनंदहरी, विनायक कुलकर्णी, रमेश जावीर, रविकिरण जावीर, रोशनकुमार पिलेयान, अरूण कांबळे-बनपुरीकर, संभाजी गायकवाड, सचिन कुलकर्णी, वैमव कुलकर्णी, वैशाली माळी, डॉ. मंदार खरे, चैतन्य कुलकर्णी, मेहबुब जमादार कवी संमेलनास उपस्थित राहणार आहेत.
गदिमांनी 'बामणाचा पत्रा' या ठिकाणी अनेक साहित्य निर्माण केले. त्याच ठिकाणी शिदोरी साहित्य संमेलन होत आहे, या साहित्य मेजवानीचा लाभ आटपाडीसह सांगली जिल्हयातील साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आटपाडी तालुका साहित्य मंच, मसाप शाखा आटपाडी, माडगुळकर परिवार व माडगुळे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा