पिंपळगाव लेंडी फाट्यावर निर्मळेश्वर यात्रेतील घटना
शिवशाही वृत्तसेवा, सिदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
जालना ते मेहकर रोडवरील किनगाव राजा येथून जवळ असलेले पिंपळगाव लेंडी फाट्यावर निर्मळेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेत आग्या मोहोळाच्या मधमाशांनी धुमाकूळ घातला. सकाळी दहा आणि दुपारी तीनच्या सुमारास असे दोनदा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शंभरावर भाविक जखमी झाले. यातील पंधराजण गंभीर जखमी आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनाही मधमाशांनी चावे घेऊन जखमी केले. २६ फेब्रुवारीच्या दुपारी ही घटना घडली. मधमाशांना पांगविण्यासाठी एका टिप्परमध्ये धूर करण्यात आला.
मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात्रेत मोठा गोंधळ उडाला. प्रल्हाद रंदवे (७०) व त्यांच्या पत्नी शुशला रंदवे (६५) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांना अमोल पवार यांच्या स्विफ्ट गाडीमधून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच तहसील कार्यालयामधील बाबू इंगोले हेदेखील जखमी झाले. हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. १०८ क्रमांकावर फोन लावून नागरिकांनी मदत मागितली.
केवळ नऊ किलोमीटर अंतरावर असताना रुग्णवाहिका अर्धा तास उशिरा आली. गजानन गायके, अविनाश गायके व त्यांच्या सहकारी मित्रांनी टिप्परमध्ये धूर करून रोडवर फेऱ्या मारल्यानंतर मधमाशा पांगल्या. ज्ञानेश्वर तिकटे, बंडू गायके, सुभाष गायके, शिवाजी लबडे, गजू गायके, नंदू तिकटे यांनीही धूर करण्यासाठी सहकार्य केले. जखमी झालेल्यांवर जालना येथील खासगी रुग्णालयात व काहींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किनगावराजा येथील डॉ. ज्ञानेश्वर नागरे, डॉ. ज्ञानेश्वर पातूरकर, डॉ. शिवानंद जायभाये यांच्या हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांवर उपचार करण्यात आले. किनगाव राजा येथील पवन मांटे व धनंजय मुंढे हेदेखील जखमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सचिन मानते यांनी मदत कार्य केले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा