संबंधितांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
लोणंद निरा पालखी मार्गावरील असणाऱ्या माणिक सोना एचपी पेट्रोल पंपासमोर रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यात मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात अंकीता अनिल धायगुडे या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहीती अशी, सोमवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाडेगाव हद्दीतील पालखी मार्गावरील असणाऱ्या माणिक सोना एचपी पेट्रोल पंपासमोर बाळु पाटलांची वाडी येथील तिघेजण मोटार सायकल वरून निराच्या दिशेला जात असताना पेट्रोल पंपा समोर पाण्याची लिकेज काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोटारसायकल आदळून मोटार सायकल वरील अंकिता अनिल धायगुडे वय 18 ही शाळकरी मुलगी जागीच ठार झाली असून विशाल दौलत धायगुडे वय 27 आणि सानिका विलास धायगुडे वय 18 रा. बाळु पाटलाची वाडी हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
पालखी मार्गावरील लोणंद ते नीरा मार्गावरील रस्त्यातच कालपासून लोणंद नगर पंचायतच्या पाईप लाईनचे दुरुस्तीचे काम चालू होते. सदर ठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे बॅरीकेटस् किवा अडथळा उभारला नाही, या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्यावरच असणारा हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने हा अपघात घडला असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या अपघातानंतर बाळुपाटलाची वाडी येथील ग्रामस्थांनी लोणंद येथे राजमाता अहिल्यादेवी चौक येथे रस्ता अर्धा तास अडवून धरत दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळेस लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी रास्ता रोको करणाऱ्या ग्रामस्थची समजूत काढत त्यांना लोणंद पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत चालू होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा