आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट, पंढरपूर शहरात व्यक्त होत आहे हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढपुरतील जेष्ठ पत्रकार शंकरराव कदम यांचे पुत्र ऋतिक कदम या २४ वर्षीय तरुणाने पंढरपुरातील यमाई तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मयत तरुण ऋतिक कदम हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे अन्नछत्र विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याच बरोबर तो वकिलीचे शिक्षण देखील घेत असल्याचे समजते.
रात्रीच्या सुमारास मयत तरुण ऋतिक कदम याने त्याच्या मित्रास फोन करून आपण जीवन संपवत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या मित्राने तातडीने यमाई तलावाकडे धाव घेतली. मात्र तो पर्यंत ऋतिक कदम याने पाण्यात उडी घेतली होती. मित्राने घडलेला प्रकार तातडीने शंकरराव कदम यांना कळवला. घटनेची माहिती करतात नगरपरिषद कर्मचारी व पोलीसांनी घटनास्थळी नाव घेतली. रात्री उशिरा पर्यंत मृतदेहाचा शोध घेतला परंतु मृतदेह मिळून येत नव्हता.
त्यामुळे पुन्हा पहाटेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. पंढरपुर नगर पालिकेच्या पथकासह सुनील कोताळकर, अप्पा करकमकर आदींनी मयत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा