चिमुकल्या व्यापाऱ्यांच्या आवाजाने गजबजला शाळेचा परिसर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्ह्या परिषद प्राथमिक शाळा ओझर्डे ता. वाई यांनी आगळावेगळा असा चिमुकल्यांचा बाल बाजार शाळेच्या पटांगणात शाळेच्या वतीने भरविण्यात आला होता . त्याला ओझर्डे ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला बाल बाजार हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नाहीतर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे. यावेळी मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक वृंद यांसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची पालेभाजी,वडापाव , चिंचा, आवळे, उकडे तांदूळ, विविध प्रकारची लोणची , घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ, खाद्यपदार्थांमध्ये भेल सेंटर, चहा भजी, यांचा यात समावेश होता. ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. या बाजारातील उत्साह पाहून त्यांच्यात पालक, परिसरातील नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.
बाल बाजार या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे वजन व मापे यांचा प्रत्यक्ष वापर करता यावा तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे बाल बाजार भरवण्यात आला असे मत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.
ओझर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबविलेला बाल बाजार उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत अशा प्रकारे उपक्रम राबविल्यास यात विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत होत्या
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा